पिंपरी : रावेत येथील देवकर प्लाझा बिल्डिंगमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली एका पोलिसाची ५४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जुलै २०१९ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडली.
विशाल लक्ष्मण ओव्हाळ (वय ३२, रा. कावेरीनगर, पोलिस वसाहत, वाकड) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. १९) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल दत्तात्रय देवकर आणि कुमोद अनिल देवकर (रा. निगडी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल ओव्हाळ हे पोलिस आहेत.
संशयितांनी आपसांत संगनमत करून देवकर प्लाझा बिल्डिंगमध्ये फ्लॅटचे बांधकाम पूर्ण न करता, त्याचा ताबा न देता, फिर्यादी आणि त्यांचे मित्र अनिल जगताप व जावेद मुजावर यांच्याकडून धनादेश आणि आरटीजीएसद्वारे एकूण ५४ लाख ५० हजार रुपये स्वीकारले. संशयितांनी या संपूर्ण रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला आणि फिर्यादीची फसवणूक केली. तसेच, संशयितांनी फिर्यादीला धमकीदेखील दिली.