पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक; चार पिस्तूल, पाच काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:59 IST2025-11-13T17:59:14+5:302025-11-13T17:59:49+5:30
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांची कारवाई

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक; चार पिस्तूल, पाच काडतुसे जप्त
पिंपरी : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनने तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त केली. ही कारवाई (दि. १२ नोव्हेंबर) बोडकेवाडी फाटा, हिंजवडी-माण रस्त्यावर करण्यात आली. संशयितांपैकी एकाचे शरद मोहोळ टोळीशी ‘कनेक्शन’ असल्याचे समोर आले आहे.
प्रवीण गुंडेश्वर अंकुश (२१, रा. कात्रज, पुणे), विकी दीपक चव्हाण (२०, रा. हिंजवडी), रोहीत फुलचंद भालशंकर (२२, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अंमलदार अमर राणे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध शस्त्रांबाबत माहिती काढत असताना पोलिस अंमलदार अमर राणे यांना माहिती मिळाली की, पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बोडेकवाडी फाटा येथे पिस्तूल घेऊन येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आठ लाख पाच हजार रुपये किमतीचे चार पिस्तूल आणि पाच जीवंत काडतुसे जप्त केली.
अटक केलेले संशयित पोलिस रेकॉर्डवरील आहेत. प्रवीण अंकुश याच्या विरोधात २०२३ मध्ये घाटकोपर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याबाबत गुन्हा दाखल आहे. रोहित भालशंकर याच्या विरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात शस्त्र बाळगल्या प्रकरणी २०२४ मध्ये, पॉस्को प्रकरणी खडक आणि २०२३ मध्ये शिरूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.
विकी चव्हाण याच्या विरोधात यावर्षी हिंजवडी पोलिस ठाण्यात शस्त्र बाळगल्याचा एक गुन्हा दाखल आहे. त्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्याने साथीदारांसोबत अवैध शस्त्र विक्रीचा गुन्हा केला. विकी हा शरद मोहोळ टोळीशी संबंधित असल्याचा कयास आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, दीपक खरात, सहायक उपनिरीक्षक संजय गवारे, प्रवीण दळे, नितीन ढोरजे, कुणाल शिंदे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, विक्रम कुदळ, बाबा चव्हाण, अली शेख, कृष्णा शितोळे, प्रशांत सैद, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, रवी पवार, धनंजय जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.