खून झालेल्या 'ती'चा मोबाइल 'बोलला'; भरदिवसा झाला होता महापालिकेतील अधिकाऱ्याच्या पत्नीचा खून
By नारायण बडगुजर | Updated: November 27, 2025 14:01 IST2025-11-27T14:00:42+5:302025-11-27T14:01:17+5:30
- संशयिताच्या घरातील नवीन गादी, सायकल, घरगुती साहित्याने पोलिसांचा संशय बळावला; प्राधिकरणात भरदिवसा घरात घुसून झाला होता महापालिकेतील अधिकाऱ्याच्या पत्नीचा खून

खून झालेल्या 'ती'चा मोबाइल 'बोलला'; भरदिवसा झाला होता महापालिकेतील अधिकाऱ्याच्या पत्नीचा खून
पिंपरी : चोरीसाठी घरात घुसून महिलेवर कोयत्याने वार करून खून करताना झटापटीत त्याच्या शर्टाचे बटण तुटुन पडले. रक्ताच्या थारोळ्यातील महिलेचे दागिने आणि मोबाइल फोन घेऊन त्याने धूम ठोकली. नंतर मोबाइल फोन गहाण ठेवला. तोच मोबाइल दोन आठवड्यांनी सुरू झाला आणि पोलिसांना 'क्ल्यू' मिळाला. कौशल्याने तपास करून पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एक अधिकारी, ३२ वर्षीय पत्नी आणि दोन मुलांसह निगडी प्राधिकरणात वास्तव्यास होते. २६ ऑगस्ट २०११ रोजी त्यांची दोन्ही मुले नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली. त्यानंतर पावणेदहाच्या सुमारास अधिकारीही कामावर गेले, पत्नी एकटीच घरी असताना संशयित आला. गार्डनचे काम करण्यासाठी साहेबांनी पाठवल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पत्नीने पतीला फोन करून विचारणा केली. त्यावर आपण कोणालाही पाठविले नसल्याचे त्याने सांगताच काही सेकंदात मोबाइल फोन बंद झाला.
पतीने तुम्हाला पाठविलेले नाही, तुम्ही कोण, अशी विचारणा करताच संशयिताने कोयत्याने वार केले. त्यानंतर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यांच्या अंगावरील दागिने आणि मोबाइल असा २ लाख १४ हजारांचा ऐवज लुटून संशयित पसार झाला.
पाळत ठेवून केला गुन्हा
संबंधित अधिकाऱ्याच्या घराजवळील बंगल्याचा केअरटेकर म्हणून संशयित राहत होता. आपण शाळेत शिपाई असल्याचे त्याने पत्नीला सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही काम नसल्याने आर्थिक अडचण होती.अधिकारी असल्याने त्यांच्या घरात दागिने आणि पैसे असल्याचा अंदाज लावत त्याने पाळत ठेवली. त्यासाठी अधिकाऱ्याच्या बंगल्यासमोरील मंदिराजवळ विनाकारण बसायचा. मुले आणि अधिकारी घराबाहेर पडण्याची वेळ त्याने माहिती करून घेतली.
लोकेशन परभणीत
दोन आठवड्यांनंतर अधिकान्याच्या पत्नीचा फोन सुरू झाल्याचे तांत्रिक विश्लेषणातून समोर आले. त्या फोनचे लोकेशन परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात असल्याचे दिसले. फोन असलेल्या व्यक्तीकडे पोलिसांनी चौकशी केली.
संशयितांचा शोध सुरू
देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शर्टचे तुटलेले बटण,संशयिताच्या अंगावरील केस यासह काही पुरावे घटनास्थळावरून मिळाले. यावरून तत्कालीन पोलिस निरीक्षक राम जाधव यांच्या पथकाने तपास सुरू केला. तत्कालीन सहायक निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक फौजदार किरण आरुटे, हवालदार सतीश कुदळे यांनी संशयितांचा शोध सुरू केला.
महिलेचा मोबाइल फोन, संशयिताच्या शर्टच्या बटणामुळे तपासाला दिशा मिळाली. कोयता व संशयिताचे केस सबळ पुरावा ठरला. त्याला जन्मठेप होण्यासाठी न्यायालयाचे कामकाज पोलिस अंमलदार अल्ताफ शेख आणि बाळू तोंडे यांनी काम पाहिले होते. - सोमनाथ जाधव,पोलिस निरीक्षक