पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने भोंदूंनी घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 18:23 IST2025-12-30T18:22:49+5:302025-12-30T18:23:10+5:30
अघोरी प्रथांचा अवलंब केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी चौघा भोंदूंविरुद्ध गुन्हा दाखल केला

पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने भोंदूंनी घातला गंडा
आळंदी : अलौकिक शक्तीद्वारे पैशाचा पाऊस पाडून दाखवितो, असे सांगून जादूटोणा केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी चौघांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राजेंद्र वाकोडे, दगडू शिवराम गायकवाड, मीना कांबळे आणि सचिन मोरे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, याबाबतची अधिकृत माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली आहे.
सदरची घटना चऱ्होली खुर्दमधील संत भगवानबाबानगर येथे ९ डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली होती. राजेंद्र वाकोडे आणि दगडू गायकवाड या दोघांनी स्वतःकडे अलौकिक शक्ती असल्याचे सांगून तंत्र विद्येच्या माध्यमातून पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून मीना कांबळे आणि सचिन मोरे यांनी आपल्या घरात हा विधी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता, तिथे एक पत्र्याचा डबा आणि लहान मुलांच्या खेळण्यातील ५०० रुपयांच्या बनावट नोटांची प्रत्येकी १०० नोटा असलेली १६ बंडले मिळून आली.
याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध व समूळ उच्चाटन अधिनियम कलम ३ आणि ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.