ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये भाड्याच्या वादातून चालकावर सिलिंडर-फरशीने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:43 IST2026-01-30T13:42:43+5:302026-01-30T13:43:28+5:30
डोक्यात छोटा गॅस सिलिंडर मारला, तर दुसऱ्याने डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केले.

ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये भाड्याच्या वादातून चालकावर सिलिंडर-फरशीने हल्ला
पिंपरी : ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये गाडी भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या चालकावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि.२७) चिंबळी फाटा येथील न्यू साउथ कार्गो मुव्हर्स ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमध्ये घडली.
आनंद दिलीप कारंडे (वय ४२, कारंडेवाडी, माण, सातारा) यांनी याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जावेद महमंद शेख (४०, काळेवाडी), शोएब खलील मोमीन (४०, फुलेनगर वाई, सातारा), राजकुमार रामचंद्र भोसले (२५, सांगोला, सोलापूर) आणि सुनील सखाराम राठोड (२२, जिंतूर, परभणी) यांना अटक करण्यात आली आहे.
कारंडे संशयित जावेदकडे भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी जावेदने शिवीगाळ करीत इतर संशयितांना तिथे बोलावून घेतले. एकाने फिर्यादीच्या डोक्यात छोटा गॅस सिलिंडर मारला, तर दुसऱ्याने डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केले. सिलिंडर हवेत उंचावून संशयिताने आरडाओरडा केल्याने परिसरातील लोक भीतीपोटी पळून गेले आणि दुकाने बंद करून घेतली. फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला होता. आळंदी पोलिस तपास करीत आहेत