तरुणीने प्रेमास नकार दिल्याने रिक्षासह चार दुचाकी पेटवल्या;तरुणावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 18:24 IST2025-12-30T18:24:29+5:302025-12-30T18:24:50+5:30
एका तरुणीने प्रेमास नकार दिल्याने संशयित अभिषेक याने वाहने पेटविल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरुणीने प्रेमास नकार दिल्याने रिक्षासह चार दुचाकी पेटवल्या;तरुणावर गुन्हा दाखल
पिंपरी : तरुणीने प्रेमास नकार दिल्याच्या कारणावरून रिक्षा आणि चार दुचाकींना आग लावल्याचा प्रकार घडला. यात रिक्षा आणि चार दुचाकी खाक होऊन तीन लाख १५ हजारांचे नुकसान झाले. रहाटणी परिसरातील श्रीनगरमधील स्वामी समर्थ कॉलनीत सोमवारी (दि. २९ डिसेंबर) रात्री सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली.
अभिषेक राजाराम श्रीनामे (वय २२, रा. स्वामी समर्थ कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. भगवान अशोक घनाते (५३, रा. स्वामी समर्थ काॅलनी, श्रीनगर, रहाटणी) यांनी याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भगवान घनाते हे रिक्षा चालक आहेत. त्यांनी घरासमोर रिक्षा आणि दुचाकी पार्क केली होती. तसेच त्यांच्या भावांनी दुचाकी पार्क केल्या होत्या.
दरम्यान, संशयित अभिषेक श्रीनामे याने फिर्यादी भगवान यांची रिक्षा व दुचाकी तसेच त्यांच्या भावांच्या दुचाकीला आग लावली. नागरिक व अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली; मात्र तोपर्यंत चार दुचाकी आणि रिक्षा आगीत खाक झाल्या. यात तीन लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू केला आहे. संशयित अभिषेक श्रीनामे हा पेट्रोल ओतून वाहने पेटवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे. एका तरुणीने प्रेमास नकार दिल्याने संशयित अभिषेक याने वाहने पेटविल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.