बसथांब्यावर सोनसाखळी चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By नारायण बडगुजर | Updated: January 22, 2026 19:43 IST2026-01-22T19:42:30+5:302026-01-22T19:43:05+5:30
गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई : तीन गुन्हे उघडकीस, पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बसथांब्यावर सोनसाखळी चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपरी : बसथांब्यांवर वयोवृद्ध महिलांना लक्ष्य करून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अवघ्या एका तासात जेरबंद केले. यात सोनसाखळी चोरी, घरफोडी व दुचाकी चोरी असे तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणत पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएल बसथांब्यांवर महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी तसेच घरफोडीच्या घटनाही घडत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे शाखा युनिट एकने दोन स्वतंत्र पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. दरम्यान, निगडी बसथांबा परिसरात वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करून पळणाऱ्या तीन महिलांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन लाखांचे मंगळसूत्र व गंठण हस्तगत केले. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही आंतरराज्य टोळी असल्याचे उघड झाले आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, याचवेळी दिघी परिसरात घरफोडी करणाऱ्या एका संशयितासह चोरीचे सोने विकण्यास मदत करणाऱ्या महिलेलाही अटक करण्यात आली. त्यांनी दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दीड लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करून दिघी पोलिस ठाण्यातील दोन गुन्हे उघड करण्यात आले. तिसऱ्या कारवाईत, दुचाकी चोरी करणाऱ्या विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडील दीड लाख रुपये किमतीची स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आली. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, श्रेणी उपनिरिक्षक शिवानंद स्वामी, सहायक उपनिरिक्षक सूर्यकांत चेताळ, संतोष इंगळे, पोलिस अंमलदार जयवंत राऊत, देवा राऊत, अजय डगळे, सागर अवसरे, उषा दळे, विजय शेळकंदे, मारुती करचुंडे, महादेव जावळे, शिवराम भोपे, सोहल चिखलकर, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, संदेश देशमुख, उध्दव खेडकर, दीपक तांदळे, केशव चेपटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.