तिजोरी कुठे आहे? हात-पाय बांधून सशस्त्र दरोडा;निगडी प्राधिकरणात सहा लाखांचा माल लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 19:19 IST2025-07-20T19:18:23+5:302025-07-20T19:19:56+5:30

महिलेसह पाच दरोडेखोरांवर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

pimpari-chinchwad crime Armed robbery at Nigdi Authority; Property worth Rs. 6 lakh 15 thousand looted | तिजोरी कुठे आहे? हात-पाय बांधून सशस्त्र दरोडा;निगडी प्राधिकरणात सहा लाखांचा माल लुटला

तिजोरी कुठे आहे? हात-पाय बांधून सशस्त्र दरोडा;निगडी प्राधिकरणात सहा लाखांचा माल लुटला

पिंपरी : तोंड बांधून आलेल्या संशयितांनी व्यावसायिकाच्या बंगल्यात केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील सर्वांचे हात, पाय आणि तोंड चिकटपट्टीने बांधून त्यांना खोलीत कोंडले. त्यानंतर व्यावसायिकाला हाताला बांधून पिस्तुलाच्या धाकाने दरोडा टाकण्यात आला. दरोडा टाकून दरोडेखोर पळून गेले. यामध्ये सहा लाख १५ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. प्राधिकरण निगडी येथे शनिवारी (दि. १९ जुलै) रात्री नऊ ते साडेदहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

निगडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी रविवारी (दि. २० जुलै) एका महिलेसह पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरणातील बंगल्यामध्ये ७६ वर्षीय व्यावसायिक शनिवारी रात्री नऊच्या सुमारास टीव्ही पाहत बसले होते. त्यावेळी चार ते पाच दरोडेखोर मुख्य दरवाजातून घरात आले. त्यांनी व्यावसायिकाला पिस्तूल दाखवले आणि तिजोरी कुठे आहे, असे विचारले. त्यानंतर अगरवाल यांचे हात बांधून तोंडावर चिकटपट्टी चिकटवली. त्यापूर्वी संशयितांनी केअर टेकर महिलेसह तिच्या पती आणि दोन्ही मुलांना बांधून, तोंडाला चिकटपट्टी लावून खोलीत बंद केले. दरोडेखोरांनी घरातील सर्व खोल्यांमधील साहित्य अस्ताव्यस्त केले.

यामध्ये दोन लाख ४० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या, ८० हजार रुपये किमतीची सोन्याची रिंग व नथ, ८० हजार रुपये किमतीची चांदीची एक किलो वजनाची वीट, ८० हजार रुपये किमतीची एक किलो वजनाची चांदीची भांडी, एक लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी, १० हजार रुपये किमतीचे दोन घड्याळ, पाच हजार रुपये रोख रक्कम, दोन आधार कार्ड, कारचे आरसी बुक असा एकूण सहा लाख १५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. निगडी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांकडून संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: pimpari-chinchwad crime Armed robbery at Nigdi Authority; Property worth Rs. 6 lakh 15 thousand looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.