वडगाव मावळ येथे विचित्र अपघात; पीएमपी बस, कार, डंपरची धडकेत डंपरचालक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:15 IST2025-03-28T12:13:53+5:302025-03-28T12:15:21+5:30
हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास झाला.

वडगाव मावळ येथे विचित्र अपघात; पीएमपी बस, कार, डंपरची धडकेत डंपरचालक जखमी
वडगाव मावळ : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव येथील मातोश्री हॉस्पिटल चौकात पीएमपीची बस, कार व डंपर यांचा विचित्र अपघात झाला. तिन्ही वाहने धडकली. त्यात डंपरचालक जखमी झाला असून, डंपरची ट्रॉली रस्त्यावर उलटल्याने अपघात झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी बस (क्र. एमएच- १४, एचयू- ६२९३), डंपर (क्र. एमएच- १४, एचजी- ६६७७) आणि कार (क्र. एमएच- १२, एसई- ९८२४) या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. ही तिन्ही वाहने मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने जात होती. मातोश्री हॉस्पिटलजवळील चौकात हा अपघात झाला. चौकात नेहमीच्या ठिकाणी थांबलेली पीएमपी बस, पाठीमागून येणारी कार आणि तिच्या पाठीमागून येणारा डंपर यांच्यात हा अपघात झाला. अपघातानंतर कार आणि बस आणि डंपरच्या मध्ये असल्याने तिचे प्रचंड नुकसान झाले. डंपर ब्रेक लावल्यानंतर उलटला. यात खडी रस्त्यावर सांडली व डंपरची ट्रॉली उलटून खाली पडली.
गतवर्षीच्या अपघाताची पुनरावृत्ती
गतवर्षी याच ठिकाणी ‘पीएमपी’च्या बसला वाचवताना कंटेनर रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात घुसला होता. त्या अपघातात एक महिला ठार झाली होती. तर तीनजण जखमी झाले होते. अपघातानंतर या चौकात वडगावकर नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर ‘आयआरबी’च्या अधिकाऱ्याने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनाची आजपर्यंत पूर्तता करण्यात आलेली नाही, याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.