बंदी असलेल्या रस्त्यावर मिक्सर ट्रकचा कहर; तरुणीचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:54 IST2026-02-10T13:53:46+5:302026-02-10T13:54:31+5:30
चिखली येथे कुदळवाडीतील डायमंड चौकात घडला.

बंदी असलेल्या रस्त्यावर मिक्सर ट्रकचा कहर; तरुणीचा जागीच मृत्यू
पिंपरी : जड वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यावर भरधाव आलेल्या मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) सकाळी अकराच्या सुमारास चिखली येथे कुदळवाडीतील डायमंड चौकात घडला.
वैष्णवी सुजित दिघे (वय २२) असे मृत तरुणीचे नाव आहे. सीमा बजरंग ढमाले (३०) असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत अमोल सखाराम ठोसर (३६, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मिक्सर ट्रकचालक बिहारी पांडुरंग जाधव (४१, रा. काले कॉलनी, चऱ्होली) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मेहुणी वैष्णवी दिघे आणि एक महिला सीमा ढमाले या दोघी दुचाकीवरून जात होत्या. भरधाव आलेल्या मिक्सर ट्रकवरील चालकाने दुचाकीला धडक दिली. डायमंड चौकातील रस्त्यावरील अवजड वाहतुकीला बंदी आहे. असे असतानादेखील मिक्सर चालकाने त्याचे वाहन या रस्त्याने आणले. या अपघातात वैष्णवी आणि सीमा यांच्या अंगावरून मिक्सरचे चाक गेले. त्यात वैष्णवी हिचा मृत्यू झाला, तर सीमा या गंभीर जखमी झाल्या आहेत.