PCMC Mayor:पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सत्ता कायम; रवी लांडगे महापौर, शर्मिला बाबर उपमहापौर यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:14 IST2026-02-06T12:13:19+5:302026-02-06T12:14:57+5:30
- भाजपचे रवी लांडगे महापौर, शर्मिला बाबर उपमहापौर बिनविरोध

PCMC Mayor:पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सत्ता कायम; रवी लांडगे महापौर, शर्मिला बाबर उपमहापौर यांची बिनविरोध निवड
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महत्त्वाच्या सत्तास्थानांवर भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. महापौर पदासाठी भाजपचे रवी बाबासाहेब लांडगे, तर उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.
महापालिकेतील विशेष सभेत पीठासीन अधिकारी दीपक तावरे यांनी अधिकृत घोषणा केली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही पक्षाकडून विरोधी अर्ज न आल्याने भाजपचे दोन्ही उमेदवार निर्विवादपणे विजयी ठरले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी याबाबत शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना पत्राद्वारे माहिती दिली होती. त्यानुसार सोमवारी (दि. २) उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी कोणताही उमेदवार देण्यात आला नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाने पिंपरी-चिंचवड महापौर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येणे निश्चित झाले. महापौर व उपमहापौर पदाची सूत्रे भाजपकडे गेल्याने शहरातील आगामी प्रशासकीय निर्णयांवर भाजपचा प्रभाव अधिक वाढणार आहे.