शिवनेरीचा टोल भरण्यासाठी प्रवाशांनी काढली वर्गणी; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका, उर्से टोलनाक्यावरील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:47 IST2025-12-19T11:46:28+5:302025-12-19T11:47:02+5:30
विशेष म्हणजे बसमध्ये गर्भवती महिला व वृद्ध प्रवासी असल्याने दीर्घ प्रतीक्षेमुळे त्यांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला

शिवनेरीचा टोल भरण्यासाठी प्रवाशांनी काढली वर्गणी; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका, उर्से टोलनाक्यावरील प्रकार
तळेगाव दाभाडे : तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत सेवा देण्याची जबाबदारी ज्यांची, त्यांच्याच निष्काळजीपणामुळे प्रवाशांवर टोल भरण्यासाठी वर्गणी काढण्याची वेळ आली. ई-शिवनेरी बसच्या फास्टटॅग खात्यात शिल्लक नसल्याने बुधवारी (दि. १७) रात्री तळेगाव दाभाडेजवळील उर्से टोलनाक्यावर बस सुमारे तासभर थांबवून ठेवण्यात आली. या प्रकाराने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दादरहून पुण्याकडे जाणारी ई-शिवनेरी बस रात्री साडेनऊच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर पोहोचली असता फास्टटॅग रिचार्ज नसल्याचा प्रकार उघडकीस आला. टोल कर्मचारी टोल भरल्याशिवाय बस पुढे नेण्यास तयार नसल्याने बस जागेवरच अडकली. प्रवाशांनी वारंवार विचारणा करूनही डेपो व्यवस्थापनाशी संपर्क होऊ शकला नाही.
अखेर प्रवाशांनीच पैसे जमा करून टोल भरला आणि प्रशासनाच्या अपयशाची जबाबदारी स्वतःच्या खिशातून उचलली. विशेष म्हणजे बसमध्ये गर्भवती महिला व वृद्ध प्रवासी असल्याने दीर्घ प्रतीक्षेमुळे त्यांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. “तिकीट आम्ही भरतो, पण बसचा फास्टटॅग रिचार्ज ठेवण्याची जबाबदारी कोणाची? प्रशासन झोपेत असताना प्रवाशांनी वर्गणी काढून व्यवस्था सांभाळावी, ही गंभीर बाब आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बेफिकिरी उघड झाली असून, संबंधितांवर कारवाई करून भविष्यात असे प्रकार घडू नयेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.