कंपन्यांमधून लाख रुपयांचे पार्ट चोरले; सीसीटीव्हीमुळे अडकले जाळ्यात, तिघांना जेलची हवा

By नारायण बडगुजर | Published: April 10, 2024 04:53 PM2024-04-10T16:53:34+5:302024-04-10T16:54:10+5:30

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून टेम्पो, सीसीटीव्ही आणि मोबाईल नंबर लोकेशनच्या आधारे तिघांना ताब्यात घेतले

Parts worth lakhs of rupees stolen from companies Thieves trapped due to CCTV, three want jail | कंपन्यांमधून लाख रुपयांचे पार्ट चोरले; सीसीटीव्हीमुळे अडकले जाळ्यात, तिघांना जेलची हवा

कंपन्यांमधून लाख रुपयांचे पार्ट चोरले; सीसीटीव्हीमुळे अडकले जाळ्यात, तिघांना जेलची हवा

पिंपरी : कंपन्यांमध्ये चोऱ्या करणारी टोळी चिखली पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून एक लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चिखली पोलिसांनी ही कारवाई केली. 

आलम युनुस मणियार (वय ३३), दीपक कपिलदेव तिवारी (२२, दोघेही रा. पुनावळे. मूळ रा. उत्तर प्रदेश), जुबेर अब्दुलवहाब मेमन (२७, रा. पुनावळे. मूळ रा. आंध्र प्रदेश), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीतील  गणेश नगरमधील प्रवीण इंडस्ट्रीज या कंपनीतून अज्ञातांनी एक लाख ७५ हजार रुपये किमतीचे पार्ट चोरून नेले. ही घटना ५ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी प्रवीण भुजबळ यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चिखली पोलिसांनी प्रवीण इंडस्ट्रीज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एका टेम्पोमधून काहीजण आले. त्यांनी कंपनीतील पार्ट चोरून नेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी टेम्पोच्या क्रमांकावरून टेम्पोच्या मालकाला संपर्क केला. मात्र तो टेम्पो एक वर्षापूर्वी रामविलास यादव यांना विकला असल्याचे समजले. यादव यांच्याशी संपर्क केला असता संबंधित टेम्पो त्यांनी अफझल युनुस मणियार याला दिला असल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आलम, जुबेर आणि दीपक या तिघांना अटक केली. त्यांचे साथीदार अफझल युसूफ मणियार आणि छोटू शामलाल यादव यांचा पोलिस शोध घेत आहेत. कंपनीमधून चोरी केलेला एक लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीचे लोखंडी डायमीटरचा सर्व मुद्देमाल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेला टेम्पो पोलिसांनी जप्त केला. 

चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक निरीक्षक उद्धव खाडे, पोलिस अंमलदार बाबा गर्जे, सुनील शिंदे, चेतन सावंत, भास्कर तरळकर, दीपक मोहिते, संदीप मासाळ, अमर कांबळे, गौतम सातपुते, कबीर पिंजारी, संदीप राठोड, संतोष सपकाळ, संतोष भोर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.  

सापळा लावून घेतले ताब्यात

रामविलास यादव हा पुनावळे येथे राहत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या मोबाइल क्रमांकाचे लोकेशन काढले. त्यानंतर यादव याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्याने हा टेम्पो अफझल याला दिला असल्याचे सांगितले. टेम्पो आलम मणियार घेऊन असल्याचे पुढे आले. त्यानंतर पुनावळे परिसरात सापळा रचून पोलिसांनी तिघांना अटक केली.

Web Title: Parts worth lakhs of rupees stolen from companies Thieves trapped due to CCTV, three want jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.