पिंपरीत ऑनलाइन क्रिकेट बेटिंगप्रकरणी दोन ठिकाणी छापे, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 18:38 IST2025-03-06T18:37:40+5:302025-03-06T18:38:53+5:30
- या प्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलिस हवालदार गणेश मेदगे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

पिंपरीत ऑनलाइन क्रिकेट बेटिंगप्रकरणी दोन ठिकाणी छापे, दोघांना अटक
पिंपरी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारताने विजय मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्यासाठी पिंपरीत ऑनलाइन बेटिंग घेतली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून दोघांना अटक केली. पिंपरी व्हॉलिबॉल ग्राऊंडमधील ओपन हॉल येथे पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने एकाला अटक केली, तर गुंडा विरोधी पथकाने पिंपरीतील साधु वासवानी पार्कजवळील रविकिरण सोसायटीत छापा टाकून एकाला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले संशयित रोमी सुरेश नेहलानी (वय ३७, रा. डेअरी फार्म रोड, पिंपरी) आणि नरेश परसाराम तोलानी (३९, रा. रविकिरण सोसायटी, पिंपरी) आहेत. तसेच निल्लू ऊर्फ नीलेश राम रखियानी (रा. पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलिस हवालदार गणेश मेदगे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस पेट्रोलिंगदरम्यान हवालदार बाबांना मिळालेल्या माहितीनुसार, नरेश तोलानी घरात बसून भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटिंग घेत असल्याचे आढळले. त्यानुसार पोलिसांनी रविकिरण सोसायटीतील तोलानीच्या घरावर छापा टाकला. दरवाजा उघडला न गेल्याने पोलिस उपनिरीक्षक जगताप यांनी आत प्रवेश केला. तेव्हा तोलानी मोबाइल व वही-पेन घेऊन बेटिंग घेत असल्याचे निदर्शनास आले.
दुसऱ्या प्रकरणात पोलिस अंमलदार रामदास यशवंत मेरगळ यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याचे समजले. यानंतर पथकाने पिंपरीतील व्हॉलिबॉल ग्राऊंड येथील ओपन हॉलमध्ये कारवाई केली. तेथे रोमी नेहलानी मोबाइलवर सामना पाहत असताना दुसऱ्या मोबाइलवर बेटिंग घेत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडील २ हजार ९४० रुपये रोख व मोबाइल जप्त केले.