ऑन ड्युटी सहायक पोलिस फौजदाराचा मृत्यू
By प्रकाश गायकर | Updated: February 21, 2025 17:37 IST2025-02-21T17:36:43+5:302025-02-21T17:37:52+5:30
किसन वडेकर हे तळवडे वाहतूक विभागात पोलिस निरीक्षक यांचे रीडर म्हणून काम पाहत होते.

ऑन ड्युटी सहायक पोलिस फौजदाराचा मृत्यू
पिंपरी : तळवडे वाहतूक विभागात कार्यरत असलेले सहायक पोलिस फौजदार किसन नामदेव वडेकर (वय ५५) यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. बालेवाडी येथे बंदोबस्ताबाबत शुक्रवारी (दि. २१) नियोजन बैठक सुरु असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा धक्का बसला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
किसन वडेकर हे तळवडे वाहतूक विभागात पोलिस निरीक्षक यांचे रीडर म्हणून काम पाहत होते. शनिवारी (दि. २२) बालेवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. वाहतूक नियोजनासाठी शुक्रवारी सकाळी बालेवाडी स्टेडियम येथे नियोजन सुरु होते. त्याच वेळी अचानक वडेकर यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
किसन वडेकर हे पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात कार्यरत होते. त्यांनी चिखली, निगडी पोलिस ठाण्यात काम केले. त्यांची मागील काही महिन्यांपूर्वी तळवडे वाहतूक विभागात बदली झाली होती. अतिशय मनमिळावू, शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पोलिस दलात ओळख होती. त्यांच्या निधनाने शहर पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.