आता चुकीला माफी नाही! पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचार उखडून काढणार : डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 11:17 IST2020-10-02T22:08:52+5:302020-10-03T11:17:57+5:30
सत्ताधाऱ्यांना जनतेला द्यावी लागणार आहेत.

आता चुकीला माफी नाही! पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचार उखडून काढणार : डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
पिंपरी: विरोधकांच्या प्रभागातील कामे अडविण्याचे धोरण सत्ताधारी भाजपाने स्वीकारले आहेत. यापुढे अडविणाऱ्यांची जिरवणार असून कोरोना कालावधीत केलेल्या खरेदीवर आक्षेप आहेत. मयतावरच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. संकटकाळात तुंबड्या भरण्याचे काम कोणी केली असेल. तर, त्यांना माफी नाही. आता भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत. यापुढे आमची विरोधाची धार वाढणार आहे, असा गर्भित इशारा सत्ताधारी भाजपालाराष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक शुक्रवारी काळभोर नगर येथे झाली. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, अजित गव्हाणे, श्याम लांडे, विक्रांत लांडे, जगदीश शेट्टी, निहाल पानसरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर, संगीता ताम्हणे, वर्षा जगताप, फजल शेख आदी उपस्थित होते.
डॉ. कोल्हे म्हणाले, पालिकेच्या निविदा रात्री-अपरात्री मंजूर केल्या जात आहेत. त्याचे नेमके गौडबंगाल काय आहे. नदी सुधार प्रकल्पाचे काय झाले. स्मार्ट सिटीत शहराची घसरण झाली आहे. शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाईप पडून आहेत. पाण्याचे कोणतेही नियोजन नाही. याची उत्तरे सत्ताधाऱ्यांना जनतेला द्यावी लागणार आहेत.'
............
शहरवासियांच्या प्रश्नासाठी महापालिकेतील सभागृहाबाहेर आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही, पालिकेतील पूर्ण भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत. यापुढे आमची विरोधाची धार वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांबाबत सत्ताधाऱ्यांनी आडवा आणि जिरवाची भूमिका घेतल्यास अडविणाऱ्याची जिरविनार आहोत, असेही डॉ कोल्हे म्हणाले.
........
डॉ कोल्हे म्हणाले, '' रॅपिड टेस्टचे रिपोर्ट येण्यास दोन दिवस आणि आरटीपीसीआरचे रिपोर्ट येण्यास दहा दिवस लागत आहेत. हा अतिशय अक्षम्यपणा आहे. रिपोर्ट येईपर्यंत रुग्ण वाहक राहू शकतात. त्यामुळेच शहरातील रुग्णवाढ झालेली दिसून येते. हे प्रशासनाचे अपयश आहे.