पिंपरी चिंचवडमध्ये एकाही आमदाराला मंत्रिपद नाही; शहरात मंत्रिपदाची गेल्या १० वर्षांपासून केवळ चर्चा
By विश्वास मोरे | Updated: December 16, 2024 19:32 IST2024-12-16T19:31:39+5:302024-12-16T19:32:54+5:30
२०१४ पासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपदाने २०२४ लाही हुलकावणी दिली

पिंपरी चिंचवडमध्ये एकाही आमदाराला मंत्रिपद नाही; शहरात मंत्रिपदाची गेल्या १० वर्षांपासून केवळ चर्चा
पिंपरी : महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराला मंत्री पद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्या टप्प्यामधील मंत्रिमंडळ विस्तारात शहरातील एकाही आमदाराला संधी मिळाली नाही, त्यामुळे शहराला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चार विधानसभा मतदारसंघातून महायुतीला भरघोस यश मिळाले, तसेच राज्यात महायुतीचे सरकार आले. त्यामुळे शहरात मंत्रिपद येईल? कोणाला संधी मिळणार? अशी चर्चा गेल्या महिन्याभरापासून रंगली होती. काही इच्छुक नेते मुंबईत तळ ठोकून होते.
यांच्या नावाची होती चर्चा
भोसरीतून भाजपचे महेश लांडगे हे तिसऱ्यांदा आमदार झाले, तसेच चिंचवडमधून शंकर जगताप हे पहिल्यांदा आमदार झाले. तर, पिंपरीतून अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीकडून तिसऱ्यांदा आमदार झाले. मावळातून सुनील शेळके हे दुसऱ्यांदा आमदार झाले. मंत्रिपदाची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपकडून आमदार लांडगे आणि जगताप यांच्या नावाची चर्चा होती. अनुसूचित जातीतील उमेदवारास संधी दिल्यास आमदार अमित गोरखे यांच्याही नावाची चर्चा होती, तर राष्ट्रवादी अजित गटाच्या वतीने आमदार सुनील शेळके आणि अण्णा बनसोडे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, सरकार स्थापन झाले, सरकार स्थापनेच्या शपथविधी झाला. त्यानंतर नागपूर येथे घेतलेल्या विविध मंत्र्यांनी शपथविधीच्या कार्यक्रमातही पिंपरी-चिंचवड मधील एकाही आमदाराला संधी मिळाली नसल्याचे दिसून आले.
मंत्रिपदाची गेल्या दहा वर्षांपासून केवळ चर्चा
राष्ट्रवादीचा गड असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये २०१४ मध्ये भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीतून अपक्ष आमदार महेश लांडगे विजयी झाले होते. लांडगे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये जगताप आणि लांडगे या जोडीने राष्ट्रवादीचा गड उद्ध्वस्त करून भाजपची सत्ता आणली. त्यामुळे २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिपदासाठी जगताप आणि लांडगे या दोघांच्याही नावाची चर्चा होती. मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी दोघांच्या नावाची चर्चा होत होती. फ्लेक्सबाजी होत होती आणि मंत्रिपदाला हुलकावणी मिळायची. २०२४ च्या निवडणुकीनंतरही शहरांमध्ये ‘मंत्री साहेब’ म्हणून आमदार समर्थकांनी फ्लेक्सबाजी केली होती. तसेच पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आमदारांच्या इच्छुक आमदारांच्या समर्थकांनी शहराला मंत्रिपद मिळावे, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.