साहेब, सांगा बरं... मोशी परिसरात रस्ता आहे की खड्यांचे संग्रहालय ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:15 IST2025-07-16T13:14:36+5:302025-07-16T13:15:28+5:30
- पालिकेचा लाखो रुपयांचा खर्च गटारात गेला असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने जनतेचा संताप आता उफाळून आला आहे.

साहेब, सांगा बरं... मोशी परिसरात रस्ता आहे की खड्यांचे संग्रहालय ?
- राजेश नागरे
मोशी : येथील बीआरटी मार्गावरील रस्त्यांचे चित्र पाहिले तर ‘रस्ता आहे की खड्ड्यांचे संग्रहालय?’ असा प्रश्न नागरिकांना पडतो. सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांनी कब्जा केला आहे.
विशेष म्हणजे महापालिकेने काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजवण्याचा दिखाऊ प्रयोग केला होता. पालिकेचा लाखो रुपयांचा खर्च गटारात गेला असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने जनतेचा संताप आता उफाळून आला आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना ते दिसतच नाहीत आणि अचानक वाहन खड्ड्यांत आदळून अपघात होतात. काही ठिकाणी दुचाकीस्वार फेकले जाऊन गंभीर जखमी झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका फक्त मलमपट्टीच्या नावाखाली वेळ मारून नेत आहे. डागडुगजीच्या नावाखाली केवळ मुरूम टाकून लाखो रुपयांचा निधी उधळला आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी सरळसरळ खेळ केला जात आहे.
मोशीतील नागरिक खड्ड्यांना कंटाळले आहेत. रोज होणाऱ्या वाहन दुरुस्तीच्या खर्चाने नागरिक हैराण झाले आहेत. सार्वजनिक रस्त्यांची ही अवस्था असूनही प्रशासन डोळेझाक करत आहे. इतकेच नव्हे, तर सोशल मीडियावर नागरिकांनी या खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून थेट पालिकेवर हल्ला चढवला आहे.
आमच्या कराच्या पैशातून जर रस्तेही व्यवस्थित मिळणार नसतील, तर पालिकेच्या अस्तित्वाचा उपयोग काय? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. यापुढे जर एखादा मोठा अपघात झाला, तर त्याची जबाबदारी थेट महापालिकेवर असेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
बीआरटी रस्त्याच्या संदर्भात देखभाल दुरुस्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी मी महापालिका प्रशासनाकडे करणार आहे. - वसंत बोराटे, माजी नगरसेवक
बीआरटी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. त्यासाठी पालिकेकडे अनेकवेळा मागणी केली. मात्र, पालिकेने याकडे लक्ष दिले नाही. आम्हाला खड्ड्यांची सवय झाली आहे; परंतु बाहेर गावातून येणारे प्रवासी मोशीमध्ये येताच त्यांचे खड्ड्यांनी स्वागत केले जाते. - रूपाली आल्हाट, शहराध्यक्षा, उद्धवसेना
विभागासंबंधित सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. - अभिमान भोसले, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका