मित्राचा खून करून पळाले, मात्र कुरिअर पार्सलवरून अडकले; अशी झाली गुन्ह्याची उकल
By नारायण बडगुजर | Updated: August 7, 2025 14:48 IST2025-08-07T14:46:34+5:302025-08-07T14:48:41+5:30
- गुंडाविरोधी पथकाच्या कौशल्यपूर्वक तपासामुळे गुन्ह्याची उकल : खासगी बसने पळून जात असलेल्या दोघांना वाशिम येथून ठोकल्या होत्या बेड्या

मित्राचा खून करून पळाले, मात्र कुरिअर पार्सलवरून अडकले; अशी झाली गुन्ह्याची उकल
पिंपरी : अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता दुचाकीवरून तिघे जात असल्याचे दिसले. त्यांच्या हातातील कुरिअर पार्सलवरून ‘क्ल्यू’ मिळाला. त्यातून खून प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेतले आणि खून प्रकरणाचा उलगडा होऊन खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली.
पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात ८ सप्टेंबर २०२४ रोजी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. घटनास्थळी कोणताही पुरावा नसल्याने त्याची ओळख पटत नव्हती. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या सूचनेनुसार गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले.
खून झालेल्या व्यक्तीसोबत दोन व्यक्ती दुचाकीवरून ट्रिपल सीट बसून सांगवी परिसरात दारू घेण्यासाठी आलेले आढळून आले. त्यातील एकाच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाची पार्सलची पिशवी होती. सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता तो कृष्णा चौकातील कुरिअरच्या कंपनीमध्ये गेल्याचे निष्पन्न झाले. कुरिअर कंपनीमध्ये चौकशी केली असता संशयिताचे नाव समजले.
जेवणासाठी थांबले अन्...
पोलिसांनी संशयिताचा मोबाइल क्रमांक मिळवून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले. त्याच्या फोनचे लोकेशन पारनेर येथे असल्याचे समजले. त्यानुसार पथक संशयिताच्या मागावर रवाना केले. अर्धा तास एकच लोकेशन आल्याने संशयित जेवणाकरिता थांबल्याचा संशय आला. पोलिसांनी त्या भागातील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित जेवण करण्यासाठी तासापूर्वी थांबल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लागलीच सीसीटीव्हीमार्फत संशयित प्रवास करीत असलेल्या ट्रॅव्हल्स बसचा क्रमांक मिळवला.
बसचा पाठलाग करून ठोकल्या बेड्या
बसच्या चालकाच्या मोबाइलवर पोलिसांनी संपर्क साधला. बसमध्ये संशयित असून पोलिस पाठलाग करीत असल्याचे त्याला सांगितले. बसचा वेग कमी ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. चालकाने बसचा वेग कमी ठेवल्याने पोलिसांनी वाशिम येथे बसला गाठले. संशयितांना समृद्धी महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील शेल टोल प्लाझा येथून ताब्यात घेतले.
संशयित पकडल्यानंतर मृताची ओळख
खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. मात्र, पथकाने कौशल्यपूर्वक तपास करून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना बोलते केल्याने त्यांनी कबुली दिली. त्यानंतर खून झालेल्याची ओळख पटविण्यात आली.
सततच्या भांडणामुळे दोघांनी मित्राचा खून केला आणि मृतदेह सांगवी जिल्हा रुग्णालय परिसरात टाकून दिला. त्यानंतर ते बसने पळून जात होते. मात्र, कुरिअर पार्सलवरून संशयितांची ओळख पटवली आणि गुन्ह्याची उकल होण्यास मदत झाली. - हरिश माने, सहायक पोलिस निरीक्षक, गुंडाविरोधी पथक