चिखलीत १९ वर्षीय मुलाकडून तरुणाचा खून; भरदिवसा केले कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 16:45 IST2021-07-12T16:45:22+5:302021-07-12T16:45:29+5:30
रविवारी दुपारी घडली घटना, आरोपी अटकेत

चिखलीत १९ वर्षीय मुलाकडून तरुणाचा खून; भरदिवसा केले कोयत्याने वार
पिंपरी: घर सोडून जाण्यास कारणीभूत असल्याच्या गैरसमजातून चिखलीत भरदिवसा तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. ११) दुपारी पावणेदोनच्या सुमारास चिखलीत साने चौकात घडली. आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर (वय ३८, रा. परशुराम चौक, चिंचवड) असे खून झालेल्याचे नाव आहे. आकाश उर्फ़ मकसूद विजय जाधव (वय १९, रा. कुदळवाडी,चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनल क्षिरसागर (वय २७) यांनी फिर्याद दिली आहे.
एक वर्षापूर्वी जाधव हा कानिफनाथ यांच्या घराशेजारी राहण्यास होता. तो मित्रांना घेऊन घरात दारू प्यायचा. त्यामुळे आजुबाजूच्या लोकांनी त्याला घर सोडून जाण्यास सांगितले होते. मात्र, आपल्याला घर सोडून जाण्यास कानिफनाथ हेच कारणीभूत आहेत, असा गैरसमज जाधव याला होता. त्यातून त्याने कानिफनाथ यांचा खून करण्याचा कट रचला.
रविवारी दुपारी अल्पवयीन मुलाने कानिफनाथ यांना फोन करून साने चौकातील शुभम हॉटेलजवळ मांडवाच्या कामानिमित्त बोलवून घेतले. कानिफनाथ तेथे गेले असता जाधव याने कानिफनाथ यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून केला. हा प्रकार दाट लोकवस्तीच्या ठिकाणी घडला.