मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : ‘ऑफिसबॉय’नेच अमेडिया कंपनीचा पार्टनर म्हणून स्वाक्षऱ्या केल्याचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:29 IST2025-12-24T16:28:13+5:302025-12-24T16:29:40+5:30
- शीतल तेजवानीच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : ‘ऑफिसबॉय’नेच अमेडिया कंपनीचा पार्टनर म्हणून स्वाक्षऱ्या केल्याचा खुलासा
पिंपरी : मुंढवा येथील सरकारी जमीन अमेडिया कंपनीला विकण्यासाठी शीतल किशनचंद तेजवानी (वय ४५) हिच्या ‘ऑफिसबॉय’ने कंपनीचा पार्टनर म्हणून अभिनिर्णय प्रक्रियेचा अर्ज, प्रतिज्ञापत्र आणि अधिकारपत्रावर स्वाक्षरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्या अनुषंगाने तेजवानी आणि या ऑफिसबॉयमध्ये झालेले व्यवहार आणि दस्ताच्या देवाणघेवाणीबाबत बावधन पोलिस तपास करत आहेत. त्यासाठी तेजवानी हिच्या पोलिस कोठडीत शनिवारपर्यंत (दि. २७ डिसेंबर) वाढ करण्यात आली.
मुंढवा येथील सरकारी जमीन परस्पर पार्थ पवारांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीला विकताना कोट्यवधीचे मुद्रांक शुल्क चुकवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी कथित कुलमुखत्यारपत्र धारक शीतल किसनचंद तेजवानी, कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्याविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात बावधन पोलिसांनी शीतल तेजवानी हिला अटक करून १६ डिसेंबर रोजी मुळशी तालुक्यातील पौड न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने तिला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तिला मंगळवारी (दि. २३ डिसेंबर) दुपारी पौड न्यायालयात हजर करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यात झालेल्या ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ (कुलमुखत्यारपत्र) व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी जाहीर केले आहेत. तेजवानीच्या वकिलांनीच दिलेल्या या मुखत्यारपत्राच्या प्रत्येक पानावर पार्थ पवार यांची स्वाक्षरी असून, त्यांचे तेजवानीसह व्हॉट्सॲप चॅटिंगही असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
त्याचा दाखला बावधन पोलिसांनी न्यायालयासमोर दिला. या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी नवनवीन खुलासे केले असून, ते पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे तपासाची दिशा बहुआयामी झाली असून, तपासात सहकार्य करत नसलेल्या तेजवानी हिची या अनुषंगाने चौकशी करायची आहे. याशिवाय तेजवानी हिने दस्तासाठी वकिलांना दिलेली रक्कम आणि समाजमाध्यमात प्रसारित झालेल्या कागदपत्रांविषयी तपास करायचा आहे. त्यासाठी तेजवानीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते आणि सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तेजवानी हिच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली.