कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 16:42 IST2022-06-03T16:21:32+5:302022-06-03T16:42:52+5:30

वडील व मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत...

mother and daughter died on the spot in a tragic accident on Katraj-Dehuroad bypass highway | कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू

कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू

किवळे (पुणे) : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गाने रावेतकडून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या किवळे पुलाच्या अखेरच्या वळणाजवळ झालेल्या अपघातात दोघींचा मृत्यू झाला आहे. देहूरोडकडे चाललेल्या दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याची माहिती मिळाली असून यात आई व मुलीचा मृत्यू झाला असून वडील व मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कात्रजकडून रावेत-किवळेमार्गे देहूरोडकडे दुचाकीवरून एक कुटुंब चालले होते. किवळेतील मुकाई चौकाजवळील पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग सुरु होतो. तेथील वळणाजवळ संबंधित दुचाकी आली असता एका अज्ञात कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील कुटुंब महामार्गावर पडले. त्यामुळे दुचाकीवरील महिला व तिची मुलगी जखमी होऊन दोघींचा जागीच मृत्यू झाला.

मृतांची नावे अजून समजलेली नाहीत. दुचाकीस्वार व त्यांचा सुमारे आठ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाले असून दोघांना सोमाटणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अपघातस्थळी एक तुटलेले हेल्मेट पडलेले आहे. देहूरोड पोलीस, द्रुतगती महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून कंटेनर चालकाचा शोध सुरु करण्यात आला आहे.

Web Title: mother and daughter died on the spot in a tragic accident on Katraj-Dehuroad bypass highway