Pune Crime | "कोयता गँगचा आहे मी, पोलिसांना घाबरत नाही"; महिलेशी गैरवर्तन करत विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 17:17 IST2023-02-22T17:16:10+5:302023-02-22T17:17:52+5:30
महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली...

Pune Crime | "कोयता गँगचा आहे मी, पोलिसांना घाबरत नाही"; महिलेशी गैरवर्तन करत विनयभंग
पिंपरी : मी कोथरुडचा आहे, कोयता गँगचा आहे. पोलीस आमचं काही वाकड करणार नाहीत, असे म्हणत महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या अंगावर गाडी घालून तिला मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना १२ फेब्रुवारीला वाडकर चौक, हिंजवड येथे घडली. या प्रकरणी महिलेने मंगळवारी (दि.२१) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तुषार कोकरे, नितीन कोकरे यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना वाडकर चौकात रस्त्यातच टेम्पो उभा होता आणि तेथे ट्रॅफीक देखील जाम होते. तशात तेथे स्पीकरही जोरात सुरू होता. फिर्यादी यांनी गाडी थांबवून आरोपी यांना स्पीकर बंद करण्यास सांगून टेम्पो बाजुला घेण्यास सांगितले. त्यावर आरोपीे तुषार आणि नितीन यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करत मी कोथरुडचा आहे. कोयता गँगचा आहे. पोलीस आमचं काही वाकडं करणार नाही, असे म्हटले.
फिर्यादी यांनी पोलिसांना १०० क्रमांकवर फोन लावला तसेच त्या आपल्या बिल्डिंगखाली पोलीस येण्याच्या प्रतिक्षेत खुर्ची टाकून बसल्या होत्या. त्या घडलेला प्रकार आपल्या पतीसह इतरांना सांगत होत्या तेव्हा आरोपी नितीन याने त्यांची दुचाकी थेट फिर्यादीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीला मारहाण करत गैरवर्तन करत मी मुळशीचा असून कोयता गँगचा आहे. मी सात ते आठ वेळा आत गेलो आहे, असे म्हणत फिर्यादीला जीव मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीला खुर्चीवरून खाली पाडले त्यामुळे फिर्यादीला मार लागला, असे फिर्यादीत नमूद आहे.