मोबाईलचा रिचार्ज पडला चार लाखांना; अशी केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:13 IST2025-02-19T15:13:09+5:302025-02-19T15:13:29+5:30
पोलिसांनी दोन मोबाइलधारक आणि एका बँक खातेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

मोबाईलचा रिचार्ज पडला चार लाखांना; अशी केली फसवणूक
पिंपरी : तुमच्याकडून मोबाइलचे डबल रिचार्ज झाले आहे. ते पैसे परत मिळवून देतो, असे सांगत एका ज्येष्ठ नागरिकाची तीन लाख ९५ हजारांची फसवणूक केली. ही घटना ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी दहा ते दुपारी तीनच्या सुमारास गावडे पार्क, चिंचवड येथे घडली.
याबाबत ६१ वर्षीय वृद्धाने सोमवारी (दि. १७ फेब्रुवारी) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोन मोबाइलधारक आणि एका बँक खातेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना फोन केला. तुमच्याकडून डबल रिचार्ज झाला आहे. ते पैसे परत मिळवून देतो, असे सांगत फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाकडून बँकेची माहिती घेतली. या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांनी फिर्यादी यांच्या बँकेतून तीन लाख ९५ हजार रुपये परस्पर वळवून फिर्यादी यांची फसवणूक केली.