ईव्हीएम हॅकिंगचा पुरावा द्या नाहीतर कोर्टात भेटू..! भाजप नेत्याचा आमदार शेळकेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:03 IST2026-02-18T12:03:08+5:302026-02-18T12:03:43+5:30
ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याबाबत केलेला आरोप आठ दिवसांत सिद्ध करा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू

ईव्हीएम हॅकिंगचा पुरावा द्या नाहीतर कोर्टात भेटू..! भाजप नेत्याचा आमदार शेळकेंना इशारा
वडगाव मावळ : ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याबाबत केलेला आरोप आठ दिवसांत सिद्ध करा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे व भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेस भाजपचे निवडणूक प्रमुख बाळासाहेब नेवाळे, कोअर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती शेटे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, सहकार आघाडीचे अध्यक्ष बाबूलाल गराडे उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत युतीचे प्रस्ताव, ईव्हीएमबाबत आमदार सुनील शेळके यांनी केलेले आरोप यावेळी गणेश भेगडे यांनी फेटाळून लावले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली पैसे उकळण्याचा आरोप धुडकावून लावत गणेश भेगडे म्हणाले, “आठ दिवसांत आरोप सिद्ध करा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल. आरोप सिद्ध झाल्यास आम्ही राजकारणातून बाजूला होऊ. तळेगाव नगरपरिषदेमध्ये पक्षाचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता नगराध्यक्ष होणार म्हणून आम्ही युतीची तयारी दाखवली; परंतु आमदार शेळके यांनी युती धर्म पाळला नाही. यातून धडा घेत आम्ही युतीबाबत सावध भूमिका घेतली. जिल्हा परिषद निवडणुकीत युतीबाबत चर्चा झाली नाही, खोटे आरोप करून आमदार शेळके आमच्यात वाद लावत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जनतेचा कौल व पराभवाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. ही नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पदाचा राजीनामा दिला आहे.”
‘शोकसभा तहकूब होणे लाजिरवाणे नाही का?’
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी अजित प्रतिष्ठान स्थापनेबाबत केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना गणेश भेगडे यांनी अजितदादांवर प्रेम असलेल्या कार्यकर्त्याने भावना व्यक्त केली, तर त्याला का समर्थन देऊ नये, असा सवाल केला; तसेच राष्ट्रवादीचीच सत्ता असलेल्या लोणावळा नगरपरिषदेची शोकसभा कोरमअभावी तहकूब झाली, हे लाजिरवाणे नाही का, असा सवालही त्यांनी केला.