Maval will be given Pune Zilla Parishad President honored ? | पुणे जिल्हा परिषद अध्यक्षाचा मान मावळला मिळणार?
पुणे जिल्हा परिषद अध्यक्षाचा मान मावळला मिळणार?

ठळक मुद्देपुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी मंत्रालयात तालुका अद्याप वंचितच

वडगाव मावळ : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शोभा कदम,  तर उपाध्यक्ष किंवा बांधकाम खात्याचे सभापतीपदसाठी बाबुराव वायकर यांच्या रूपाने मावळाला संधी मिळण्याची शक्यता आहे. 
पुणे  जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी मंत्रालयात झाली.अध्यक्षपद हे सर्वसाधरण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे  मावळ तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळणार का, अशी चर्चा रंगत आहे. ५२ वर्षांच्या इतिहासात मावळ तालुक्याला आजपर्यंत अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही.    
जिल्हा परिषदेवर पूर्वीपासूनच एकत्रित काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभुत्व राहिले आहे. १९९७  मध्ये दिवंगत दिलीप टाटिया यांना बांधकाम समितीचे सभापतीपद मिळाले होते. तर मागील पंचवार्षिकमध्ये अतिष परदेशी समाजकल्याण समितीचे सभापती होते. जिल्हा परिषदेच्या ५२ वर्षांच्या इतिहासात मावळ तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही.   
राष्ट्रवादी काँग्रेसचे शोभा कदम, कुसुम काशीकर व राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष बाबूराव वायकर जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. 
मावळ तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून आमदारकी भाजपाच्या ताब्यात होती़ मावळ विधानसभेच्या निवडणुकीत २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील शेळके विजयी झाले. त्यामुळे मावळ तालुक्याला झुकते माफ मिळेल, अशी फलदायी आशा कार्यकर्ते बाळगून आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे पाच सदस्य असून, तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन भारतीय जनता पक्षाचे आहेत. नितीन मराठे व अलका धानिवले हे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. 
जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर आणि अजित पवार यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे त्यांना उपाध्यक्ष किंवा बांधकाम खात्याचे सभापतीपद मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे़ जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम यांचे नावही चर्चेत आहे. 
दरम्यान मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे या वेळी मावळ तालुक्याला अध्यक्षपदाची संधी दिली जाईल, अशी चर्चा परिसरातील नागरिकांमधून होत आहे. थोड्याच दिवसात चित्र स्पष्ट होईल.
........
पुणे जिल्हा परिषदेत मावळ तालुक्याला महत्त्वाचे पद या वेळी आणणारच आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. तालुक्यातील जनतेमुळे मला आमदारकीची संधी मिळाली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे तालुक्याला महत्त्वाचे पद आणणार. - सुनील शेळके, आमदार.
 

Web Title: Maval will be given Pune Zilla Parishad President honored ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.