महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना हार्ट अटॅकने मृत्यू; १२ डिसेंबरला होणार होते लग्न

By नारायण बडगुजर | Updated: December 4, 2024 19:58 IST2024-12-04T19:57:39+5:302024-12-04T19:58:29+5:30

१२ डिसेंबरला पैलवानाचे लग्न होणार होते, त्यासाठी कुटुंबियांची लगबग सुरू असून लग्नाची खरेदी व जय्यत तयारी केली जात होती

Maharashtra Kesari wrestler dies of heart attack while exercising The wedding was to take place on December 12 | महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना हार्ट अटॅकने मृत्यू; १२ डिसेंबरला होणार होते लग्न

महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना हार्ट अटॅकने मृत्यू; १२ डिसेंबरला होणार होते लग्न

पिंपरी : जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने कुमार महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान विक्रम शिवाजीराव पारखी (वय ३०) याचा मृत्यू झाला. हिंजवडी येथे बुधवारी (दि. ४) सकाळी घडलेल्या या घटनेने मुळशी तालुक्यावर शोककळा पसरली. पैलवान पारखी याचे १२ डिसेंबर रोजी लग्न होणार होते.  

मुळशी तालुक्यातील माणगाव येथील भूमिपुत्र असलेल्या विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरून मानाची गदा मिळवली होती. २८ नोव्हेंबर २०१४ रोजी वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित ‘‘महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०१४’’ झाली होती. त्यात विक्रम याने अजिंक्यपद मिळवले. विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदके व किताब मिळवले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. 

झारखंड येथील रांचीमध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने ब्राँझ पदक मिळवले होते. मुळशीतल्या माले केसरी स्पर्धेचा विजेता बनून माले केसरी किताब व गदा मिळवली होती. अशा अनेक नामांकित कुस्ती स्पर्धेत माणगावचे आणि मुळशी तालुक्याचे नाव विक्रम पारखी याने उंचावले होते. हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे यांच्याशी त्याचे गुरू-शिष्याचे नाते होते. विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. विक्रम याच्यामागे आई, वडील, एक विवाहित भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. 

लग्नाच्या तयारीची लगबग

विक्रम पारखी याचे १२ डिसेंबर रोजी लग्न होणार होते. त्यासाठी कुटुंबियांची लगबग सुरू होती. लग्नाची खरेदी तसेच इतर जय्यत तयारी केली जात होती. मात्र, विक्रम यांच्यावर काळाने घाला घातला.

पैलवान विक्रम पारखी यांचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. - कन्हैय्या थोरात, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, हिंजवडी पोलिस ठाणे

Web Title: Maharashtra Kesari wrestler dies of heart attack while exercising The wedding was to take place on December 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.