माण-हिंजवडी मेट्रोचे कोच दाखल; लवकरच होणार ‘ट्रायल रन’ प्रकल्पास वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:07 IST2025-02-28T14:07:44+5:302025-02-28T14:07:44+5:30
हिंजवडी ते शिवाजीनगर हा पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांना जोडणारा मेट्रो प्रकल्पातील तिसरा मेट्रो मार्ग

माण-हिंजवडी मेट्रोचे कोच दाखल; लवकरच होणार ‘ट्रायल रन’ प्रकल्पास वेग
पिंपरी : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. त्यासह मेट्रोचे कोच देखील दाखल झाले आहे. त्यामुळे लवकरच ‘ट्रायल रन’ घेऊन ऑक्टोबर २०२५ पर्यंत मेट्रो सुरू होईल, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प पीएमआरडीएकडे आहे. ‘पीपीपी’ (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या कामातील दिरंगाईमुळे 'पीएमआरडीए'ने ठेकेदाराला दंडात्मक कारवाईचा इशारा देत काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानंतर जुलैपासून काम वेगाने सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. हिंजवडी (माण, मेगापोलीस) ते शिवाजीनगर हा पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांना जोडणारा हा मेट्रो प्रकल्पातील तिसरा मेट्रो मार्ग आहे.
हा संपूर्ण मार्ग उन्नत असून, पुणे-बंगळुरू महामार्ग आणि मुळा नदीवरून जात आहे. प्रामुख्याने बाणेर, सकाळनगर आणि सिव्हिल कोर्ट स्थानकांची कामे शिल्लक आहेत. यांसह विविध ठिकाणी जिने आणि अकरा स्थानकांचे महत्त्वाचे काम बाकी आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मेट्रोची ‘ट्रायल रन’ घेण्यात येणार आहे.
..असा आहे प्रकल्प
प्रस्तावित खर्च : ८,३१३ कोटी रुपये
मेट्रो मार्गाचे अंतर : २३.३ किलोमीटर
एकूण स्थानकांची संख्या : २३
कामे पूर्ण झालेली स्थानके : १२
मार्चअखेर पुन्हा येणार कोच
आतापर्यंत पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पात गेल्या वर्षी एक तर गेल्या आठवड्यात एक अशा आतापर्यंत दोन ट्रेन अर्थात दोन संच दाखल झाले आहेत. मेट्रोचा तिसरा आणि चौथा संच देखील मार्च अखेर उपलब्ध होणार आहे, असे सांगण्यात येत आहे. मेट्रोच्या एका संचामध्ये तीन कोच आहेत.
आयटी पार्कमधील ‘कोंडी’ फुटणार
माण-हिंजवडी आयटी पार्कमध्ये लाखो अभियंते नोकरीनिमित्त दररोज ये-जा करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत हिंजवडी परिसरातील रस्त्यांवर मोठी कोंडी होते. मात्र, मेट्रो सुरू झाल्यानंतर या अभियंत्यांना आरामदायक प्रवास अनुभवता येणार आहे. यातून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
मेट्रो प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण होताच मार्ग सुरक्षा तपासणी केली जाईल. गेल्या वर्षी मेट्रोच्या तीन कोचचा एक संच मिळाला होता. तसेच गेल्या आठवड्यात पुन्हा तीन कोचचा एक संच दाखल झाला आहे. या कोचचे इन्स्पेक्शन सुरू आहे. मेट्रोचे उर्वरित काम लवकर पूर्ण करून ‘ट्रायल रन’ घेण्यात येणार आहे. - रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए