'मै तेरे को जिंदा नही छोडुंगा’, हातउसने पैशांच्या वादातून मजुराचा लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून खून

By नारायण बडगुजर | Published: April 22, 2024 04:20 PM2024-04-22T16:20:25+5:302024-04-22T16:20:36+5:30

मजुराने उसने घेतलेले पैसे परत न केल्याने त्याला अंदाजे ४० फूट खोल लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून दिले.

laborer killed a laborer by pushing him into the lift duct due to a money dispute. | 'मै तेरे को जिंदा नही छोडुंगा’, हातउसने पैशांच्या वादातून मजुराचा लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून खून

'मै तेरे को जिंदा नही छोडुंगा’, हातउसने पैशांच्या वादातून मजुराचा लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून खून

पिंपरी : हातउसने घेतलेले पैसे परत न केल्याने एका मजुराने दुसऱ्या मजुरासोबत वाद घातला. तसेच लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून त्याचा खून केला. मोशी येथील शिवाजीवाडीमधील श्री साई फाॅर्च्यून राॅयल ग्रुप बांधकाम साईटवर रविवारी (दि. २१) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

सत्यनारायण कर्ष (वय ३२), असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. सुरेंद्रकुमार व्यासनारायण कर्ष (३२, रा. श्री. साई फाॅर्च्यून राॅयल ग्रुप बांधकाम साईट, लेबर कॅम्प, शिवाजीवाडी, मोशी), असे अटक केलेल्याचे नाव आहे. गजानंद किरिसिंग कर्ष (३९, रा. श्री. साई फाॅर्च्यून राॅयल ग्रुप बांधकाम साईट, लेबर कॅम्प, शिवाजीवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानंद यांचा भाऊ सत्यनारायण कर्ष याने सुरेंद्रमुमार कर्ष याच्याकडून एक हजार रुपये हातउसने घेतले होते. सुरेंद्रनारायण कर्ष आणि सत्यनारायण कर्ष हे बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. दरम्यान, सत्यनारायण कर्ष, रुपेश साहू, गोलू साहू, प्रदीप कर्ष, अक्षयकुमार साहू हे रविवारी श्री. साई फाॅर्च्यून सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर लिफ्टच्या डक्टजवळ प्लास्टर काम करत होते. त्यावेळी सुरेंद्रकुमार याने सत्यनारायण कर्ष याच्यासोबत हातउसने पैशांवरून वाद घातला. रागाने त्याची काॅलर पकडून शिवीगाळ केली. ‘‘मेरा पैसा अभीके अभी दो, नही तो मै तेरे को जिंदा नही छोडुंगा’’, असे सुरेंद्रकुमार म्हणाला. सत्यनारायण याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जोरजोरात धक्के देत त्यास पाठीमागील लिफ्टच्या अंदाजे ४० फूट खोल लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून दिले. यात सत्यनारायण हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले. खूनप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी सुरेंद्रकुमार याला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक किरण पठारे तपास करीत आहेत.

Web Title: laborer killed a laborer by pushing him into the lift duct due to a money dispute.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.