अवघ्या दोनवर्षीय रायाजीने सर केला साल्हेर किल्ला; ‘गिनीज बुक’मध्ये होणार नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:51 IST2025-02-05T12:50:55+5:302025-02-05T12:51:02+5:30
सर्वांत लहान वयात महाराष्ट्रातील सर्वांत उंच साल्हेर किल्ला आणि सर्वांत उंच शिखर कळसुबाई सर करणारा तो सर्वांत लहान मुलगा ठरला

अवघ्या दोनवर्षीय रायाजीने सर केला साल्हेर किल्ला; ‘गिनीज बुक’मध्ये होणार नोंद
ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : उंच किल्ले आणि शिखर विविध व्यक्तींनी सर केल्याची वार्ता आतापर्यंत आपण ऐकले-वाचले असेल; परंतु रायाजी सुधीर घारे... वय २ वर्षे १० महिने... मावळातील ओझर्डे हे त्याचे गाव... त्यामुळे किल्ले आणि त्याविषयी त्याला जन्मत: बाळकडू मिळालेले. सर्वांत लहान वयात महाराष्ट्रातील सर्वांत उंच साल्हेर किल्ला आणि सर्वांत उंच शिखर कळसुबाई सर करणारा तो सर्वांत लहान मुलगा ठरला आहे.
दोन्ही किल्ले अवघ्या १५ दिवसांमध्ये सर करणारा तो एकमेक लहान बालक ठरला आहे. ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये त्याची नोंद करण्यात येणार असून, त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी लवकरच नोंद होणार असल्याची माहिती त्याचे वडील सुधीर घारे यांनी दिली.
साल्हेर किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील साल्हेरवाडी गावाच्या पायथ्याशी गुजरात हद्दीवर सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे. त्याची उंची १ हजार ५७६ मीटर आहे. ११ जानेवारीला सकाळी ७:४६ मिनिटांनी रायाजीने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सरदार सूर्याजी काकडे यांचे दर्शन घेऊन मोहिमेला सुरुवात केली. १२ वाजून ०५ मिनिटांनी किल्ल्याच्या सर्वांत उंच ठिकाणी असलेल्या भगवान परशुराम मंदिराचे त्याने दर्शन घेतले. साल्हेर ही मोहीम त्याने ४ तास २० मिनिटांत पूर्ण केली; तसेच २७ जानेवारीला रायाजीने महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसुबाई जे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट शिखर म्हणून ओळखले जाते तेही सर केले.
कळसुबाईला ४ तास वेळ...
२७ जानेवारी रोजी रायाजीने कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी या गावातील जहागीरदारवाडीतून शिखराकडे प्रवास सुरू केला. पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी पायथ्याशी असलेल्या कळसुबाई कमानीपासून त्याने मोहिमेला सुरुवात केली आणि सकाळी ८ वाजून २३ मिनिटांनी त्याने महाराष्ट्रातील उंच शिखर असलेल्या कळसुबाई या शिखरावरील कळसुबाई मंदिराचे दर्शन घेतले. या मोहिमेसाठी त्याला ४ तास एवढा वेळ लागला. या सर्व मोहिमेत रायाजीला आई-वडील व कुटुंबातील इतर सदस्य यांनी मार्गदर्शन केले.
आतापर्यंत १६ गड केले सर...
आतापर्यंत रायाजीने १६ गड-किल्ले सर केले आहेत. त्यामध्ये सर्वांत उंच किल्ला साल्हेर ही त्याची १५वी मोहीम व सर्वांत उंच कळसुबाई शिखर ही त्याची १६वी मोहीम होती. आम्हा दोघाही पती-पत्नीला गड-किल्ले फिरण्याची हौस होती. त्यामुळे रायाजीच्या जन्मापासूनच त्याला गड-किल्ल्यांविषयी माहिती देत आलो आहोत. त्याच्या खेळण्यातही मावळे, किल्ले असेच असतात. गडावर फिरायला जायचे म्हटले की, तो लगेच तयार होतो. - प्रिया सुधीर घारे, रायाजीची आई