जिजामाता रुग्णालयप्रमुख, लिपिकाची उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:09 IST2024-12-19T15:09:58+5:302024-12-19T15:09:58+5:30
दोन महिन्यांत १८ लाख ६६ हजार ३८८ रुपयांचा गैरव्यवहार

जिजामाता रुग्णालयप्रमुख, लिपिकाची उचलबांगडी
पिंपरी : जिजामाता रुग्णालयाच्या लेखा परीक्षणात दोन महिन्यांत १८ लाख ६६ हजार ३८८ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जिजामाता रुग्णालयप्रमुख डॉ. सुनीता श्रीरंग साळवे व लिपिक आकाश प्रदीप गोसावी यांची बदली केली आहे. महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील रोजच्या भरणा रकमेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी केला होता. त्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.
जिजामाता रुग्णालयात रोजच्या रोज जमा होणाऱ्या भरणा रकमेत मोठा भ्रष्टाचार झाला. १ मार्च ते ३० एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत ९ लाख ७६ हजार ६९१ रुपयांची रक्कम जिजामाता रुग्णालय व महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हडप केली, असा आरोप काँग्रेसने केला होता.
काय आहे प्रकरण?
जिजामाता रुग्णालयात रोजच्या रोज जमा करण्यात येणाऱ्या रक्कम भरणाऱ्या रजिस्टरमध्ये अफरातफर झाली. रोजच्या रोज जमा होणारी भरणा रक्कम बँकेत न भरता अधिकाऱ्यांनी तिचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. रुग्णांकडून जमा होणारी रक्कम रोजच्या रोज न भरता नंतरच्या तारखेला भरण्यात आली. १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये एकूण १८ लाख ६६ हजार ३८८ रुपये ३० दिवसांनी भरल्याचे लेखापरीक्षणात सिद्ध झाले आहे.
आधीही गैरव्यवहारप्रकरणी कारवाई
लेखापरीक्षणात डॉ. सुनीता साळवे व लिपिक आकाश गोसावी यांनी गैरव्यवहार केल्याचे आढळले. डॉ. साळवे यांच्यावर या आधीही मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी कारवाई झाली आहे. डॉ. साळवे यांची बदली यमुनानगर रुग्णालयाच्या प्रमुखपदी केली आहे. लिपिक आकाश गोसावी याची मुख्यालयात बदली केली आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढला आहे.