पिंपरी : बेपत्ता गुन्ह्यातील व्यक्तीचा शोध घेत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून खून उघडकीस आणला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
शानू रफिक मोहम्मद शेख (रा. विलेपार्ले, मुंबई) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शरद गौतम घरद (३६, रा. काळेवाडी), असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह गिरीधर वाल्मीक रेडे (रा. मोई, ता. खेड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शानू हे कामानिमित्त ताथवडे येथील कंपनीत एक दिवसापूर्वी आले होते. मात्र, ते घरी न पोहचल्याने आणि मोबाईल बंद आढळल्याने कंपनीतील व्यस्थापकाने वाकड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली. या प्रकरणात संशयास्पद बाबी आढळल्याने पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखा युनिट चारला तपासाची जबाबदारी दिली.
युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास केला. दरम्यान पेरणे फाटा, भीमा नदीपात्रात एक मृतदेह आढळून आला. नातेवाईकांनी मृत व्यक्तीची ओळख पटवली. शानू यांचा मृतदेह असल्याचे समोर आले. त्यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा वाकड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. तांत्रिक तपासावरून संशयित शरद घरद याला युनिट चारच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने मयत शानू याला जेवणाच्या बहाण्याने काळेवाडी येथे बोलावून घेतले. नंतर दारुच्या नशेत किरकोळ वादातून दगडाने ठेचून त्याचा खून करून मृतदेह भीमा नदीत फेकल्याचे उघड झाले.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डाॅ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखालील युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, उपनिरीक्षक भरत गोसावी, मयुरेश साळुंखे, सहायक उपनिरीक्षक संजय गवारे, पोलिस अंमलदार प्रवीण दळे, कृणाल शिंदे, सुरेश जायभाये, मोहम्मद गौस नदाफ, नितीन ढोरजे, भाऊसाहेब राठोड, प्रशांत सैद, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, रवि पवार, तांत्रिक विश्लेषणाचे सहायक उपनिरीक्षक नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.