वारकऱ्यांना पवित्र असणारी इंद्रायणी नव्या रूपात; नदीच्या सुशोभीकरणासाठी १५०० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 13:14 IST2023-02-02T13:13:50+5:302023-02-02T13:14:00+5:30
पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता विविध पर्यटनात्मक प्रकल्प राबवले जाणार

वारकऱ्यांना पवित्र असणारी इंद्रायणी नव्या रूपात; नदीच्या सुशोभीकरणासाठी १५०० कोटी
लोणावळा : वारकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला पवित्र असणारी इंद्रायणी. लोणावळ्याजवळ उगम पावते. या नदीच्या सुशोभीकरण कामासाठी १५०० कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला. लोणावळा ते तुळापूरदरम्यान हे काम केले जाणार आहे. लायन्स पॉईंट येथील वनविभागाची जागा हीदेखील शासन विकत घेणारा असून, त्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता विविध पर्यटनात्मक प्रकल्प राबवले जाणार आहेत. त्यामुळे नदी किनारी पर्यटनाला मोठी चालना मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोणावळा शहरातील रखडलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी लोणावळा नगरपरिषद कार्यालयात खासदार बारणे, माजी राज्यमंत्री, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाळा भेगडे यांनी नुकतीच आढावा बैठक घेऊन शासकीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी भेगडे यांनी इंद्रायणीचा नदीच्या सुशोभीकरणाविषयीचा डीपीआर मंजुरीसाठी पाठवला असल्याचे सांगितले.
लोणावळा शहर हे वनविभाग रेल्वे विभाग व टाटा कंपनी यामध्ये विभागले असल्यामुळे विकास कामांना अडथळे निर्माण होतात. याकरिता वनविभागाच्या अखत्यारीत रखडलेल्या विकास कामांची माहिती व ते विषयमार्गे लावण्याकरिता काय उपाययोजना करता येतील, याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती या बैठकीत घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, राजू बच्चे, निखिल कविश्वर, रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, रिपाइं लोणावळा शहराध्यक्ष कमलशील म्हस्के यांच्यासह वनविभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अधिकारी, टाटा कंपनीचे अधिकारी व लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
विकासकामांना निधी मिळवून देऊ
पर्यटनाचे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या लोणावळा शहरातील रखडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिले आहे.
रखडलेल्या प्रकल्पांची घेतली माहिती
लोणावळा शहरातील रखडलेले भाजी मंडई विकसनाचे काम, रोपवे प्रकल्प, तुंगार्ली धरण मजबुतीकरण, राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण, लीजचा विषय, इंद्रायणी नदीपात्राचे सुशोभीकरण, प्रधानमंत्री आवास योजना, खंडाळा तलाव सुशोभीकरण कामे, लायन्स पाॅइंट येथील पार्किंग व स्वच्छतागृहांचा विषय, रेल्वे उड्डाणपुलांची कामे, एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा आदी कामांची माहिती बैठकीत घेण्यात आली.