पावसाळ्यामुळे वाढली प्लेटलेटसची मागणी; साथीच्या आजारात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 04:26 PM2022-07-11T16:26:22+5:302022-07-11T16:26:29+5:30

सद्य:स्थितीत दिवसाला २० ते २५ प्लेटलेटसची मागणी

Increased demand for platelets due to rainfall An increase in epidemics | पावसाळ्यामुळे वाढली प्लेटलेटसची मागणी; साथीच्या आजारात वाढ

पावसाळ्यामुळे वाढली प्लेटलेटसची मागणी; साथीच्या आजारात वाढ

Next

पिंपरी : पावसाळा सुरू झाला की साथीच्या आजारांबरोबरच डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढत असते. यंदा ही शहरात अशीच स्थिती आहे. शहरात गेल्या काही दिवसांमध्ये साथीच्या आजारांचे रुग्ण वाढल्याची स्थिती आहे. परिणामी रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटसची मागणी वाढली आहे. 

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या रक्तपेढीत सद्य:स्थितीत दिवसाला २० ते २५ प्लेटलेटसच्या पिशव्यांची मागणी आहे. जून महिन्यापासून मागणी वाढली आहे, अशी माहिती वायसीएम रक्तपेढीने दिली. शहरात सद्य:स्थितीत सर्दी, खोकला, थंडी, ताप, डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण वाढल्याचे दिसून येते. वातावरणात बदल, पावसाळ्यामुळे हवेत असलेली आर्द्रता, प्रदूषण आणि डासांच्या वाढत्या उत्पत्तीमुळे नागरिकांमध्ये साथीचे आजार उद्भवत असून, नागरिकांनी अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळा सुरू असल्याने रस्त्यांवरील खड्डे, अडगळीची जागा, सभोवतालच्या मोकळ्या जागेतील गवत अशा ठिकाणी पावसाचे पाणी साचून तयार झालेल्या डबक्यांमध्ये डासांच्या माद्या मोठ्या प्रमाणात अंडी घालत असल्याने डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया, हिवताप, डेंग्यू यासारखे आजार बळावतात. तर दूषित पाणी पिण्यात आल्याने गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे आजार होण्याची शक्यता असते.

जून महिन्यापासून प्लेटलेटसची मागणी वाढली आहे. सद्य:स्थितीत दिवसाला २० ते २५ प्लेटलेटसची मागणी आहे. मागणीनुसार रुग्णांना प्लेटलेटस उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्लेटलेटस तयार करण्यासाठी दाते देखील मिळणे आवश्यक असतात.

दरवर्षी पावसाळा सुरू झाली की प्लेटलेटसची मागणी वाढत असते. दरवर्षीच्या अंदाजानुसार अजून एक महिना तरी मागणी जास्त राहण्याचा अंदाज आहे. -डॉ. शंकर मोसळगी, रक्तसंक्रमण अधिकारी, वायसीएम रक्तपेढी

पाच दिवसांपर्यंत साठा करता येतो

रक्तातून प्लाझ्मा, प्लेटलेटस हे घटक वेगळे केले जातात. प्लेटलेटस तयार केल्यावर पाच दिवसांपर्यंत साठवून ठेवता येतात. त्यामुळे रक्तपेढ्या प्लेटलेटसचा जास्त साठा करून ठेवत नाहीत. त्यामुळे मागणी वाढल्याने प्लेटलेटसचा तुटवडा जाणवतो. मागणीनुसार रुग्णांना प्लेटलेटस दिल्या जात आहेत. त्यामुळे सध्या तुटवडा नसल्याचे वायसीएम रक्तपेढीने सांगितले.

ही खबरदारी घ्यायला हवी

-पाणी उकळून पिणे
-रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळणे
-पूर्ण कपडे घालणे
-जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे
-सकस आहार घेणे
-डासांपासून बचाव करणाऱ्या गोष्टींचा अवलंब करणे
-घरात स्वच्छता ठेवणे

Web Title: Increased demand for platelets due to rainfall An increase in epidemics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.