Pimpri Chinchwad: ‘खाकी’वर वाढले हल्ले, पोलिसांची सुरक्षा धोक्यात तर सामान्यांच्या सुरक्षेचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:02 AM2024-04-10T11:02:38+5:302024-04-10T11:02:58+5:30

सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे....

Increased attacks on 'khaki', police safety in danger, what about the safety of common people? | Pimpri Chinchwad: ‘खाकी’वर वाढले हल्ले, पोलिसांची सुरक्षा धोक्यात तर सामान्यांच्या सुरक्षेचे काय?

Pimpri Chinchwad: ‘खाकी’वर वाढले हल्ले, पोलिसांची सुरक्षा धोक्यात तर सामान्यांच्या सुरक्षेचे काय?

पिंपरी :पोलिसांना अरेरावी करणे किंवा धक्काबुक्की करण्याचे प्रकार सातत्याने होत असतानाच वाहतूक पोलिसाच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रकार चऱ्होलीत सोमवारी (दि. ८) घडला. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांना मारहाण करणे, धक्काबुक्की करणे, अरेरावी करणे तसेच पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्यापर्यंत मजल गेली आहे. सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

चऱ्होली येथे वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस अंमलदार राहुल मोटे यांच्या अंगावर चारचाकी वाहन घालून त्यांना गंभीर जखमी केले. यापूर्वीदेखील पोलिसांवर वाहन घातल्याचे काही प्रकार घडले. गुन्हे दाखल झाले. त्यानंतरही असे प्रकार घडतच आहेत. पोलिसांचीच सुरक्षा धोक्यात आली असून, सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बेटिंगवाल्यांकडूनही धक्काबुक्की

गहुंजे स्टेडियम येथे मार्च २०२१ मध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या ३३ जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई दरम्यान बेटिंग घेणाऱ्या संशयितांनी पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण केली.

गावठी दारूच्या हातभट्टीवाल्यांकडून दगडफेक

मुळशी तालुक्यातील नेरे येथेही तीन वर्षांपूर्वी दारूच्या हातभट्टीवर कारवाईदरम्यान पोलिंसावर दगडफेक झाली. संशयितांमध्ये महिलांचाही समावेश होता. त्याचप्रमाणे निगडी येथे रामनगर परिसरात दारूअड्ड्यावर कारवाई करून संशयिताला ताब्यात घेतले असता त्याने पोलिसांना धक्काबुक्की केली.

महिला पोलिसांसोबतही गैरवर्तन

वाहतूक पोलिसांना बेशिस्त वाहनचालकांच्या अरेरावीला नेहमीच सामोरे जावे लागते. भररस्त्यात थांबून वाहनचालकांना थांबवून वाहन तपासणी, कागदपत्र आदींची पाहणी केली जाते. यात चिंचवड गावात वाहनाचालकांनी पोलिसांच्या अंगावर वाहन घातल्याचा प्रकार २०२० कोरोना काळात घडला होता. महिला वाहतूक पोलिसांना अर्वाच्च बोलून त्यांचा विनयभंग करण्याचेही प्रकार घडले.

पोलिस निरीक्षकाला अरेरावी

पिंपरी येथील मुख्य बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा निर्माण करत असलेल्या काही विक्रेत्यांना पोलिसांनी हटकले. त्यावरून वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षकाला अरेरावी करून धमकावल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिसांवर हल्ले केल्याप्रकरणी दाखल गुन्हे

२०१८ - ४०

२०१९ - ३३

२०२० - ४१

२०२१ - ७८

२०२२ - ५१

२०२३ - २८

२०२४ (मार्चअखेर) - ५

Web Title: Increased attacks on 'khaki', police safety in danger, what about the safety of common people?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.