फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:56 IST2025-01-20T15:56:23+5:302025-01-20T15:56:32+5:30
समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल

फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
पिंपरी : ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. आपण समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल. यात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असून कोणतेही काम करताना फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल, असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिका दिव्यांग भवनतर्फे ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.
खासदार श्रीरंग बारणे, आमदार अमित गोरखे, पद्मश्री मुरलीकांत पेटकर, राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, ‘जन्मजात दिव्यांगांना लवकरात लवकर मदत मिळावी, उपचार मिळावेत, यासाठी निधी देऊन तो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आपल्याकडील कलागुणांचा योग्य वापर करून पुढे जात राहावे. सामाजिक बांधिलकी जोपासून आपल्याकडून शक्य होईल, ती मदत दिव्यांगांना आणि सर्वच घटकांना करावी.’