‘आज याला जिवंत सोडायचे नाही’, हॉटेलचे थकीत भाडे मागितल्याने तरुणावर पिझ्झा कापण्याच्या कटरने डोक्यात वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:22 IST2025-10-20T13:21:49+5:302025-10-20T13:22:40+5:30
चाकूने वार, पिझ्झा कापण्याच्या कटरने आणि काटेरी चमच्याने डोक्यात वार केले, विटा व सिमेंट ब्लॉक फेकून मारले यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे

‘आज याला जिवंत सोडायचे नाही’, हॉटेलचे थकीत भाडे मागितल्याने तरुणावर पिझ्झा कापण्याच्या कटरने डोक्यात वार
पिंपरी : हॉटेलचे थकीत भाडे मागितल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने तरुणावर खुनी हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. १९) दुपारी सव्वातीनच्या सुमारास हिंजवडी येथे घडली.
अजिंक्य धनाजी विनोदे (२८, रा. विनोदे वस्ती, वाकड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते चिंचवडमधील जयहिंद अर्बन बँकेचे संचालक आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनाजी विनोदे यांचे चिरंजीव आहेत. याप्रकरणी सुमित भिकनराव संदानशिव (रा. बिजलीनगर, चिंचवड), विकी ऊर्फ प्रथमेश लालासाहेब तिपाले (रा. बिजलीनगर, चिंचवड), अथर्व महेश शिंदे (रा. कात्रज, पुणे), गौतम परशुराम कांबळे (रा. चिंचवड), बंटी शांताराम ठाकरे (रा. मोहननगर, चिंचवड) आणि समाधान अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत जखमी अजिंक्य विनोदे यांचे मित्र यश नेताजी साखरे (२५, रा. आदर्शनगर, हिंजवडी) यांनी रविवारी याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास जखमी अजिंक्य हे आपले मित्र यश साखरे यांच्यासोबत हिंजवडीतील हॉटेलमध्ये गेले होते. त्यांनी हॉटेलचे व्यवस्थापक सुमित याला हॉटेलचे थकीत भाडे कधी देणार, अशी विचारणा केली. या कारणावरून यातील एका संशयिताने ‘तुम्ही येथे काय आमच्याशी भांडणे करायला आलेत का, तुम्हाला माहिती आहे का मी चिंचवडचा भाई विकी तपाले आहे. मी चार वर्ष जेल भोगून आलो आहे. आम्हाला तुम्ही काय हांडगे समजता काय’, असे म्हणाला. त्यानंतर संशयित गौतम कांबळे याने शिवीगाळ करीत ‘आज याला जिवंत सोडायचे नाही’, असे म्हणून चाकूने वार केले. संशयित बंटी ठाकरे याने पिझ्झा कापण्याच्या चकतीने डोक्यात वार केले. संशयित अथर्व शिंदे याने काटेरी चमच्याने डोक्यात वार केले. संशयित तिपाले आणि समाधान याने विटा व सिमेंट ब्लॉक फेकून मारले व परिसरात दहशत निर्माण केली. तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
विकी तिपाले तडीपार गुंड
सराईत गुन्हेगार विकी तिपाले याला पोलिस उपायुक्त परिमंडळ एक यांनी १० ऑगस्ट २०२४ रोजी दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे. मात्र तडीपारीची मुदत पूर्ण होण्याआधीत तो शहरात वास्तव्य करीत असल्याचे या घटनेतून दिसून आले आहे.