...ती म्हणाली तू मर अन् त्याने केली आत्महत्या; पिंपरीतील खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 17:24 IST2021-10-26T17:24:37+5:302021-10-26T17:24:44+5:30
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनेच आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार पिंपरीत घडला आहे

...ती म्हणाली तू मर अन् त्याने केली आत्महत्या; पिंपरीतील खळबळजनक घटना
पिंपरी : लग्नानंतर स्त्रियांवर सासरच्या लोकांकडून आणि पतीकडून त्रास देण्याच्या घटनेत वाढ होत आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहित महिला आत्महत्या करून टोकाचे पाऊल उचलू लागल्या आहेत. अशाच परिस्थितीत पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनेच आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार पिंपरीत घडला आहे. ढोरे नगर गल्ली, जुनी सांगवी येथे २ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.
प्रसाद उमेशराव देशमुख (वय ३४), असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत प्रसाद यांच्या आईने सोमवारी (दि. २५) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, प्रसाद यांची पत्नी, सासू, विशाल, राजेंद्र (सर्व रा. सुभाष नगर, येरवडा) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा मुलगा प्रसाद याला खोट्या तक्रारीत अडकवण्याची व मुलाचे तोंड पाहून देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच, तुझ्या नातेवाईकांशी कुठलाही संबंध ठेवू नये, यासाठी दबाव टाकला. तू मर तू मर, असे म्हणून आरोपी पत्नीने त्रास दिला. शिवीगाळ करून दमदाटी केली. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रसादने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक के. एस. गवारी तपास करीत आहेत.