पिंपरी :नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यापेक्षा सुशोभीकरणाच्या घाट घातला जात आहे. दूषित पाण्यामुळे वाकड येथे मुळा नदीत गुरुवारी (दि. १४) शेकडो मृत मासे तरंगताना दिसून आले आहेत. त्यात नदीच्या पाण्यातील धोकादायक पातळीचे प्रदूषण स्पष्टपणे दिसून येते. स्थानिक रहिवाशांनी आणि जीवितनदी व पुणे रिव्हर रिव्हायवलच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळास कळविले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकड ते दापोडी परिसरात नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यापेक्षा सुशोभीकरण सुरू आहे. त्यास पर्यावरणवादी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. सांडपाणी व औद्योगिक कचरा थांबविण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. मात्र, त्यावर महापालिकेकडून कार्यवाही झालेली नाही. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खूपच खालावल्यामुळे वाकड येथे मासे मोठ्या प्रमाणावर मृत्यू पडले आहेत. पावसाळ्यात मासे मृत्युमुखी पडतात कसे ?नदीपात्रात मृत मासे तरंगत असताना नदीकिनाऱ्यावर दिसतात, तर दुसरीकडे नदीकाठ सुशोभीकरणाचे काम जोरात सुरू असल्याचे दिसते. यामध्ये तटबंद व पदपथ बांधण्यासाठी नदीकिनारची समृद्ध परिसंस्था उद्ध्वस्त केली जात आहे. पावसाळा असल्यामुळे आणि नदीत येणारे जिवंत झरे सुरू असल्यामुळे नदीत सध्या वाहते पाणी आहे. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासे मृत्यू पडले. त्यातून प्रदूषणाची भीषण पातळी स्पष्ट होते. पर्यावरणवादी संघटनांनी सुचविलेले पर्यायनदी पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्वप्रथम उगमापासून प्रदूषण बंद करणे, सांडपाणी योग्य प्रकारे शुद्ध करणे आणि नदीकिनारच्या वनांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे, असे पर्याय सुचविले आहे. त्यांची अंमलबाजवणी केली नाही तर सौंदर्याच्या नावाखाली नदीचे रूपांतर निर्जीव कालव्यात होईल. आज झालेला माशांचा मृत्यू हा इशारा आहे आणि तो दुर्लक्ष करण्यासारखा नाही. पर्यावरण नाश करणारे काम थांबवून, पाण्याच्या गुणवत्तेवर तातडीने लक्ष द्यावे आणि खरी नदी पुनरुज्जीवन मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञांनी केली आहे.
दूषित पाण्यामुळे मुळा नदीत शेकडो माशांचा मृत्यू;गंभीर प्रदूषण व चुकीच्या प्राधान्यक्रमाचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:20 IST