पिंपरी : शहरात शनिवारी (दि. ६) सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली असून, काही ठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे कोंडी निर्माण झाली आहे. देहूरोड–कात्रज बाह्यवळण रस्त्यावर व वाकड येथील इंदिरा कॉलेजसमोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच भोसरीजवळील टेल्को लांडेवाडी आणि शांतीनगर ते इंद्रायणी कॉर्नर रस्ता, भोसरी एमआयडीसी या ठिकाणी रस्त्याने वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना नदी ओलांडल्याचा अनुभव आला.
निगडी प्राधिकरण परिसरामध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे. तसेच प्राधिकरणातील अनेक ठिकाणी कामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. तसेच खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे.त्या ठिकाणी काम सुरू आहे, असे फलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी शक्यतो घरात राहावे, घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, विजेच्या खांबांपासून व झाडांपासून दूर रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.