Pimpri - Chinchwad: जमिनीवर पडलेली दहाची नोट उचलायला गेला अन् १० हजार गमावून बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 16:31 IST2022-01-31T16:30:52+5:302022-01-31T16:31:15+5:30
जमिनीवर पडलेली १० रुपयांची नोट उचलत असलेल्या एकाचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल दोन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेला

Pimpri - Chinchwad: जमिनीवर पडलेली दहाची नोट उचलायला गेला अन् १० हजार गमावून बसला
पिंपरी : जमिनीवर पडलेली १० रुपयांची नोट उचलत असलेल्या एकाचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल दोन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेला. वाकड येथे काळाखडक जवळ चंद्रमाऊली गार्डनच्या गेटच्या बाजूच्या लक्ष्मी बासुंदी चहा अॅण्ड स्नॅक सेंटर येथे रविवारी (दि. ३०) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
राम बन्सी सगणे (वय ४२, रा. मुंजोबानगर, काळाखडकजवळ, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लेबर ठेकेदार आहेत. ते रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या घराजवळील चंद्रमाऊली गार्डनच्या गेटच्या बाजूला लक्ष्मी बासुंदी चहा अॅण्ड स्नॅक्स सेंटर येथे चहा पिण्यासाठी गेले. चहा घेतल्यानंतर बिल देताना फिर्यादीच्या हातातील १० रुपयांची नोट जमिनीवर पडली. फिर्यादी ती नोट जमिनीवरून उचलत असताना फिर्यादीच्या पाठीमागून दोन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या खिशातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चाेरून नेला. पोलीस उपनिरीक्षक अवधूत शिंगारे तपास करीत आहेत.