आजाराला घाबरू नका..! 'जीबीएस'वर २६ रुग्णांनी केली मात;उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:41 IST2025-02-26T11:38:16+5:302025-02-26T11:41:56+5:30
आतापर्यंत ३२ जणांना लागण, एकाचा मृत्यू, तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर

आजाराला घाबरू नका..! 'जीबीएस'वर २६ रुग्णांनी केली मात;उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर
पिंपरी : शहरात आतापर्यंत ३२ जणांना जीबीएस अर्थात गुलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली असून, त्यापैकी २६ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
जीबीएस आजारात शरीराची रोग प्रतिकारकशक्ती कमी होते. स्नायूमध्ये कमकुवतपणा येतो. शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या तरुणांची आहे. २० ते ३९ वयातील १२ रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे. सर्वांत कमी संख्या सत्तरी पार केलेल्या वृद्ध नागरिकांची आहे. ७० हून अधिक वय असलेल्या केवळ एकाला या आजाराची लागण झाली आहे. लहान मुलांना देखील हा आजार होत असून, शून्य ते ९ वयोगटातील तीन मुलांना जीबीएसची लागण झाली आहे.
अचानक उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी, डायरिया (जास्त दिवसांचा), अन्न गिळताना त्रास होणे, हाता-पायांना मुंग्या येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचा सल्ला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिला आहे.