अधिकाऱ्यांसमोर टाकला कचरा

By Admin | Updated: July 28, 2015 00:45 IST2015-07-28T00:45:39+5:302015-07-28T00:45:39+5:30

परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून महापालिकेकडून कचरा उचलला जात नसल्याने नगरसेवक आणि नागरिकांनी ब प्रभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा टाकून निषेध केला.

Garbage in front of officials | अधिकाऱ्यांसमोर टाकला कचरा

अधिकाऱ्यांसमोर टाकला कचरा

थेरगाव : परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून महापालिकेकडून कचरा उचलला जात नसल्याने नगरसेवक आणि नागरिकांनी ब प्रभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा टाकून निषेध केला.
थेरगाव परिसरातील कचरा महापालिकेकडून नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ब प्रभागाचे अधिकारी सुभाष माछरे यांच्याकडेही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यांनी दखल घेतली नव्हती. म्हणून संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवक नीलेश बारणे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर बारणे यांनी नागरिकांसह सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास चिंचवड येथील ब प्रभाग कार्यालय गाठले. प्रभागाधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा टाकून संताप व्यक्त केला. थेरगाव परिसरातील सामान्य नागरिकांची व्यथा मांडली. नियमितपणे कचरा उचलला जावा, अशी मागणी केली. या वेळी शिवसेना विभागप्रमुख महेश बारणे, श्रीकांत काळेबेरे, गणेश खानेकर, स्वप्निल दिघे आदी उपस्थित होते.
आंदोलनाविषयी नीलेश बारणे म्हणाले, ‘‘स्वच्छतेचे काम करणारे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात समन्वय नाही. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. गेल्या
काही दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याने या भागात
मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचे काम करणारे ठेकेदार आणि कर्मचारी बदलल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने निषेधासाठी आम्हाला आंदोलन करावे लागले.’’(प्रतिनिधी)

Web Title: Garbage in front of officials