'मी इथला गाववाला आहे. मला हप्ता द्यायचा. नाहीतर..' चार दुकानदारांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:29 IST2025-02-26T15:28:26+5:302025-02-26T15:29:30+5:30
हप्ता देण्यास नकार दिल्याने चार दुकानदारांना मारहाण; वाकड येथे दुकानांमधील साहित्य फेकले रस्त्यावर

'मी इथला गाववाला आहे. मला हप्ता द्यायचा. नाहीतर..' चार दुकानदारांना मारहाण
पिंपरी : मी इथला गाववाला आहे. मला हप्ता द्यायचा. नाहीतर तुम्हाला इथे धंदा करू देणार नाही, अशी धमकी देत चार दुकानदारांना मारहाण केली. तसेच दुकानातील साहित्य रस्त्यावर फेकून दिले. त्यामध्ये एक पुस्तकाचे दुकान होते. त्यातील पुस्तकेदेखील रस्त्यावर फेकून दिली. याप्रकरणी सहा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाकड येथे फिनिक्स माॅलच्या समाेरील पदपथावर रविवारी (दि. २३) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
अमोल किसन कलाटे (वय ३८), अविनाश किसन कलाटे (४०, दोघे रा. वाकड), कौस्तुभ पवार आणि इतर तीन संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल कलाटे आणि अविनाश कलाटे यांना पोलिसांनी अटक केली. सागर अशोक शिंदे (२७, रा. वाकड) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २४ फेब्रुवारी) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिनिक्स माॅलच्या समोरील पदपथावर सागर शिंदे यांचा लव्ह मोमोज नावाने हातगाडा आहे. तसेच इतर दुकानेदेखील आहेत. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित हे कारमधून आले. धंदा करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल, म्हणत हप्त्याची मागणी केली. फिर्यादी शिंदे यांनी हप्ता देण्यास नकार दिला. या कारणावरून अमोल कलाटे याने शिंदे यांना मारहाण केली. शिंदे यांच्या शेजारी असलेल्या बर्गरचा दुकानदार सलमान अन्सारी, पाणीपुरी विक्रेता जितलाल, पुस्तक विक्री करणारा विशाल यांनादेखील हप्त्याची मागणी करत मारहाण केली. तसेच सर्व दुकानांमधील साहित्य रस्त्यावर फेकून हातगाडी आणि खाद्यपदार्थाचे नुकसान केले.
‘मी इथला गाववाला आहे. मला हप्ता द्यायचा. नाहीतर तुम्हाला इथे धंदा करू देणार नाही, असे म्हणून संशयिताने मोठमोठ्याने आरडा ओरडा करून दहशत माजवली. त्यानंतर संशयित पळून गेले. पोलिस उपनिरीक्षक अतुल जाधव तपास करीत आहेत.