आर्थिक वादातून ५ जणांनी मिळून एकाचा कोयत्याने वार करत केला खून; भोसरीमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 20:04 IST2025-05-16T20:04:35+5:302025-05-16T20:04:55+5:30
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपी निष्पन्न करण्यात आले

आर्थिक वादातून ५ जणांनी मिळून एकाचा कोयत्याने वार करत केला खून; भोसरीमधील घटना
पिंपरी : पुण्यात दिवसाढवळ्या खून, मारामाऱ्या, दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडू लागले आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हेगारी वाढल्याचे दिसू लागले आहे. एमआयडीसी भोसरीपोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशी ग्रँड हॉटेलसमोर आर्थिक कारणावरून पाच जणांनी मिळून एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली बर्गे (रा. चिंबळी, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अशोक म्हाळसकर, रोहन म्हाळसकर, प्रसाद म्हाळसकर, अमोल निळे आणि संकेत जैद (सर्व रा. चिंबळी, ता. खेड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशी ग्रँड हॉटेलसमोर कोयत्याने वार करून बर्गे यांचा खून करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपी निष्पन्न करण्यात आले. प्रथमदर्शनी आर्थिक वादातून हा खून झाल्याची शक्यता उपायुक्त पवार यांनी व्यक्त केली.