व्यायाम करताना अस्वस्थ वाटू लागले; अग्निशामक दलाच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:49 IST2025-10-30T14:48:30+5:302025-10-30T14:49:10+5:30
जवान ५ महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलात भरती झाले होते. त्यावेळी त्यांची शारीरिक तपासणीही झाली होती

व्यायाम करताना अस्वस्थ वाटू लागले; अग्निशामक दलाच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पिंपरी : व्यायाम करत असताना अग्निशामक दलाच्या जवानाला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चोविसावाडी अग्निशामक केंद्रात मंगळवारी (दि. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
राजेश रामभाऊ राऊत (वय ३१, रा. चऱ्होली) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राजेश राऊत हे नेहमीप्रमाणे अग्निशामक केंद्रातील जिममध्ये व्यायाम करत होते. व्यायामदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ‘थोडावेळ आराम करतो’ असे सांगून ते खाली आले. काही वेळानंतर सहकाऱ्यांनी पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळले.
सहकाऱ्यांनी त्वरित त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पाच महिन्यांपूर्वी झाले होते भरती
राजेश राऊत हे पाच महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलात भरती झाले होते. त्यावेळी त्यांची शारीरिक तपासणीही झाली होती.