चिंचवडच्या वाल्हेकरवाडीत आग, गोडाऊनमध्ये झोपलेल्या दोघांचा जागीच होरपळून मृत्यू
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 23, 2024 09:16 IST2024-01-23T08:55:54+5:302024-01-23T09:16:08+5:30
गोडाऊनमध्ये लाकडाची वखार, ज्वलनशील साहित्य असल्याने आग वेगाने पसरली

चिंचवडच्या वाल्हेकरवाडीत आग, गोडाऊनमध्ये झोपलेल्या दोघांचा जागीच होरपळून मृत्यू
पिंपरी : वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे रात्री दोनच्या सुमारास पत्राच्या शेडला आग लागली. यामध्ये दोन जणांच्या होरपळून मृत्यू झाला. आग कशामुळे लागली याचे कारण समजले नसल्याची माहिती प्राधिकरण अग्निशमन दलाने दिली.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकर वाडीतील जय मल्हार कॉलनीमध्ये पत्राशेडच्या रांगेमधील दोन शेडला आग लागली होती. दोन्ही गोडाऊन पूर्णपणे पेटलेले होते. दोन्ही गोडाऊन मधील पहिल्या गोडाऊन मध्ये असलेल्या लाकडाची वखार आणि हँड सो मशीन्सला, एअर कॉम्प्रेसर, अन्य ज्वलनशील साहित्य व उपकरणे कार ने पेट घेतला होता. तसेच दुसऱ्या गोडाऊन मध्ये अल्युमिनियमच्या फ्रेम व दोन टू व्हीलर जळून खाक झाल्या. या गोडाऊन मध्ये झोपलेल्या ललित अर्जुन चौधरी ( वय - २१) कमलेश अर्जुन चौधरी ( वय - २३) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ०४ अग्निशमन केंद्रातील एकूण ५ अग्निशमन वाहनांसह जवळपास ३५ ते ४० अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणली.