'आरटीओ'ची बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; पिंपरीत चार आरोपींना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 06:38 PM2021-03-06T18:38:20+5:302021-03-06T18:39:27+5:30

सामाजिक सुरक्षा पथकाचा सायबर कॅफेवर छापा

Exposing a racket that produced fake documents of the RTO; Four accused arrested | 'आरटीओ'ची बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; पिंपरीत चार आरोपींना अटक 

'आरटीओ'ची बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; पिंपरीत चार आरोपींना अटक 

Next

पिंपरी : ‘आरटीओ’ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन विमा, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, अशी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. काळेवाडी येथील एका सायबर कॅफेतून ८०० ग्राहकांना अशाप्रकारे बनावट प्रमाणपत्र तयार करून दिल्याचे समोर आले आहे. सायबर कॅफेवर गुरुवारी (दि. ४) छापा मारून एक लाख २१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

राहुल प्रसाद गाैंड (वय ३३, रा. रुपीनगर, निगडी), बालाजी गोरख बाबर (वय २३, रा. थेरगाव), तुकाराम अर्जून मगर (वय ३०, रा. काळेवाडी फाटा), प्रवीण दशरथ दळवे (वय २५, रा. चाकण) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासह इतर दोन आरोपींच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गाैंड हा काळेवाडी येथील आशीर्वाद सायबर कॅफेत विविध कागदपत्रे बनावट तयार करून देतो, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. आरोपी गाैंड याच्या व्हाटसअपवर त्याचे इतर साथीदार माहिती देत होते. त्यावरून गाैंड हा संगणकावर बनावट नाव, दिनांक, शिक्के, सिरीयल क्रमांक व फोटो तयार करून त्याची प्रिंट काढून त्याच्याकडील बनावर शिक्के मारून कलर झेराॅक्स प्रिंट काढून त्याचा फोटो व्हाटसअपव्दारे त्याच्या इतर साथीदारांना पाठवून देत असे. तसेच त्यांच्याकडून गुगल पेव्दारे पैसे स्वीकारत होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल व संगणकामधील माहिती डिलिट करत होता. 

संगणकावर बनावट कागदपत्रे तयार करीत असताना आरोपी ग़ाैंड याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी तीन हजार ८८० रुपयांची रोकड, एक लाख १० हजार ४०० रुपयांचे बनावट कागदपत्रे तयार करण्याचे साहित्य, सात हजारांचा मोबाईल फोन, ३०० रुपये किमतीचे तीन बनावट रबरी स्टॅम्प, असा एकूण एक लाख २१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Exposing a racket that produced fake documents of the RTO; Four accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.