भरधाव बसच्या धडकेने वृद्ध महिलेचा मृत्यू; पुणे आळंदी मार्गावरील घटना
By नारायण बडगुजर | Updated: April 27, 2023 14:18 IST2023-04-27T14:17:26+5:302023-04-27T14:18:30+5:30
स्वारगेट डेपोची बस आळंदीकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून जाताना हा अपघात घडला

भरधाव बसच्या धडकेने वृद्ध महिलेचा मृत्यू; पुणे आळंदी मार्गावरील घटना
पिंपरी : भरधाव बसच्या धडकेने वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. दत्तनगर, दिघी येथे आळंदी-पुणे रस्त्यावर बुधवारी (दि. २६) सकाळी सव्वाअराच्या सुमारास हा अपघात झाला. शांताबाई शिवराम सालपे (वय ७७) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. बसचालक ज्ञानेश्वर अर्जुन सूर्यवंशी (वय ३७, रा. कोल्हेवाडी, खडकवासला, पुणे) याच्या विरोधात पोलिसंनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची मानलेली आई शांताबाई सालपे या दत्तनगर, दिघी येथे आळंदी-पुणे मार्गावरून जात होत्या. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना शांताबाई सालपे यांना चालक ज्ञानेश्वर सूर्यवंशी याच्या बसने धडक दिली. ज्ञानेश्वर सूर्यवंशी हा महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट डेपोची बस आळंदीकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून बस घेऊन जात होता. त्यावेळी हा अपघात झाला. या अपघातात शांताबाई सालपे यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.