मद्यपींनी धावत्या PMPML चे स्टेअरिंग घेतले हातात; प्रवाशांचा थरकाप, वाहनांना दिली धडक
By नारायण बडगुजर | Updated: July 18, 2024 18:58 IST2024-07-18T18:57:49+5:302024-07-18T18:58:23+5:30
बसचालकाला दमदाटी करून स्टेअरिंग हातात घेतले आणि वेडीवाकडी बस चालवत वाहनांना धडक दिली

मद्यपींनी धावत्या PMPML चे स्टेअरिंग घेतले हातात; प्रवाशांचा थरकाप, वाहनांना दिली धडक
पिंपरी : दोन मद्यपींनी दमदाटी करून चालकाकडून स्टेअरिंग हातात घेऊन बस धोकादायकपद्धतीने चालवली. यावेळी बसची वाहनांना व नागरिकांना धडक बसली. याप्रकाराने बसमधील प्रवाशांचा थरकाप उडाला. भोसरी येथे बुधवारी (दि. १७) दुपारी सव्वाएकच्या सुमारास ही घटना घडली.
सचिन गुणाजी पारधे (४४, रा. ताडीवाला रस्ता, आंबेडकर वसाहत, पुणे स्टेशन) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संतोष जाधव (वय ४०), जितेश रमेश राठोड (३६, रा. महाळुंगे, चाकण), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी बीएनएस कलम १२६ (२), १२५, २९६, ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३), ३ (५), महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११२/११७, मप्रोव्ही कलम ८५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी दारूच्या नशेत पीएमपी बसला हात दाखवला. बसमध्ये चढून दोघांनी बस चालक सुरज सुखलाल काळे (वय २४) यांना शिवीगाळ केली. चालकाच्या केबिनमध्ये जाऊन आरडाओरडा करून बसचे स्टेअरिंग संशयितांनी त्यांच्या हातात घेतले. ‘‘तू शांत बस, आम्हास शिकवतोस का, आम्ही सुद्धा बस चालक आहोत, आम्हाला शिकवू नकोस, असे म्हणून संशयितांनी बसचालकास दमदाटी केली. त्यानंतर बस वाकडीतिकडी चालवत वाहनांना व नागरिकांना धडक दिली. फिर्यादी सचिन यांनी संशयितांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करून नखे ओरखडून जखमी केले. तसेच बसमधील प्रवाशांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे बसमधील प्रवासी घाबरले होते.